इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:45 PM2018-04-05T18:45:51+5:302018-04-05T18:45:51+5:30

कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही

Only 1.3 percent water stock in Isapur dam! | इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

इसापूर धरणात केवळ १.३ टक्के पाणीसाठा !

Next
ठळक मुद्देएप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

- इलियास शेख 

कळमनुरी ( हिंगोली ): मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हिंगोलीतील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. दरम्यान, यावर्षी कळमनुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नसल्यामुळे इसापूर धरणात आज घडीला अवघा १.३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

यावर्षीच्या मोसमात कळमनुरी तालुक्यात केवळ ५२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाली. त्यातच यंदा फेबु्रवारी महिन्याच्या शेवटीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यंतरी वाढत्या तापमानामुळे अनेक भागातील भूजलपातळीत घट होण्यास सुरूवात झाली. परिणामी, तालुक्यातील धरण, तलाव व विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने खालावण्यास सुरूवात झाली. 

त्याचा परिणाम एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात इसापूर धरणात सद्यस्थितीत अवघा १.३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या इसापूर धरणात उपयुक्त पाणीसाठा १३.२७९३ दलघमी इतका उपलब्ध असून एकूण पाणीसाठा ३२८.२४३१ दलघमी असून सध्या तरी धरणात आता १.३७७४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार उजव्या कालव्यातनू २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ दलघमी पाणी सोडल्या जात आहे. 

सदरचे सोडण्यात आलेले पाणी कालव्याद्वारे भाटेगाव, डोंगरकडा, वरुड, घोडा, कामठा, सुकळीवीर, तरोडा, वाकाडी, डोंगरगाव नाका, गुंडलवाडी, डिग्रस बु.,जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, देववाडी, सालापूर, बेलमंडळ, येहळेगाव तु., हिवरा या व नांदेड जिल्ह्यातील काही गावांना सोडले गेले आहे.
कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा या गावांतील पिकांना झाला असून या भागातील बहुतांश ठिकाणच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे समजते. तसेच गुरांसाठीही हे पाणी उपयुक्त ठरले असून यामुळे परिसरातील पाणीटंचाई दुर होण्यास मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या काल्यातून उमरखेड व हदगाव तालुक्याला पाणी सोडल्या जाते. या धरणातून कळमनुरी शहरासह तालुक्यातील मोरवाडी येथील २५ गाव पाणीपुरवठा नळ योजनेंतर्गतच्या गावांना पाणीपुरवठा होतो.

३ दलघमी पाणी आरक्षीत...
इसापूर धरणातील ३ दलघमी पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरक्षीत करण्यात आले आहे. आरक्षीत केलेले पाणी सोडावे, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना उर्ध्वपैनगंगा प्रकल्प विभाग क्र. एक नांदेड यांना ३१ मार्च रोजी पत्र लिहून आरक्षीत पाणी जिल्ह्यातील २६ गावांना सोडण्याची मागणी केली होती. वर्ष २०१७-१८ करीता धरणातील ३ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले असून कळमनुरीसह वसमत तालुक्यातील २६ गावांना पाणी सोडण्याची विनंती केली असून कळमनुरी तालुक्यातील १४ व वसमत तालुक्यातील १२ गावांसाठी आरक्षीत पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे धरणासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात पाण्याचा फायदा मात्र दुसऱ्याच जिल्ह्यातील गावांना होत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे. परिणामी, पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Only 1.3 percent water stock in Isapur dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.