घनदाट वृक्षलागवडीचे १५ टक्केच उद्दिष्ट गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:57+5:302021-08-28T04:32:57+5:30

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची ...

Only 15% of the target of dense tree planting was achieved | घनदाट वृक्षलागवडीचे १५ टक्केच उद्दिष्ट गाठले

घनदाट वृक्षलागवडीचे १५ टक्केच उद्दिष्ट गाठले

Next

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास तीन लाख चौरस मीटर क्षेत्रावर ही लागवड झाली.

हिंगोली जिल्ह्यात यंदा घनदाट वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयांसह काही यंत्रणांनी यात गेल्यावर्षी चांगले काम केले होते. या वृक्षलागवडीतील बहुतेक रोपटे जिवंत जगल्याचे पाहायला मिळत होते. यंदाही जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली नगरपालिकेने या उपक्रमात हजारो रोपटी जगविल्याचे दिसून येत आहे. जि.प.त गेल्या वर्षीच रोपटी लावली होती. यंदा त्यातील गवत काढायची फुरसतही कोणाला दिसत नाही. मात्र यंदा याच जिल्हा परिषदेने गावपातळीवर ग्रामपंचायतींमार्फत ३ लाख ७ हजार रोपटी लावली आहेत. प्रत्यक्षात २४ लाख ५२ हजार रोपटी लावण्याचे उद्दिष्ट होते. ग्रामीण भागात गायरान जमिनी, शासकीय जागा अथवा वनजमिनींवरही ही लागवड करणे शक्य असताना त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यासाठी बिहार पॅटर्ननुसार पाणी देण्यास मजूर लावण्यासही वाव आहे. तरीही ही उदासीनता दिसत आहे. निसर्गाचा समतोल बिघडण्यामागे वृक्षतोड हे मोठे कारण असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरीही ग्रामीण भागातही याबाबत बेफिकिरी आहे. पावसाची अनियमितता रोखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची असल्याने ग्रामीण भागात या योजनेला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

ग्रामविकासाच्या इतर यंत्रणांनीही दिलेल्या उद्दिष्टाएवढे काम केले नसल्याचे चित्र आहे. केवळ प्राथमिक शिक्षण विभागाने ९४६ शाळांमध्ये २१ हजार ४९३ रोपटी लावत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले. माध्यमिक शिक्षण विभागास ११ हजारांचे उद्दिष्ट असताना १४९ ठिकाणी २०२२ रोपे लावली. आरोग्य विभागाला १० हजारांचे उद्दिष्ट होते. त्यांनी २८१ ठिकाणी ७,८४६ रोपे लावली. पशुसंवर्धनने ६,२०० उद्दिष्ट असताना ६० ठिकाणी हजार रोपे लावली. बांधकाम विभागाने १३ हजार उद्दिष्ट असताना १० ठिकाणी ६ हजार रोपे लावली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५,८०० च्या उद्दिष्टापैकी ६९५, लघुसिंचनने ७,९०० च्या उद्दिष्टापैकी ९८०, समाज कल्याणने ३,९०० च्या उद्दिष्टापैकी १२५१, महिला व बालकल्याणने ४,४०० पैकी ४०००, तर बचत गटांनी १२५ ठिकाणी २,८७९ वृक्षलागवड केली.

सावली देणारी व फळझाडेही

गावपातळीवर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमध्ये प्रामुख्याने सावली देणारी झाडे निवडण्यात आली होती. याशिवाय फळझाडेही लावली. जेणेकरून त्याचे संगोपन करण्यात लोक पुढाकार घेतील. यात करंज, कडुलिंब, आंबा, गुलमोहर, चिंच या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

गावपातळीवर अशी झाली लागवड

तालुकागावेउद्दिष्टप्रत्यक्ष लागवड

हिंगोली १४४ ४,१९,१७२ १४,४१४

कळमनुरी १४७ ५,३२,२४८ ३३,९३२

वसमत १४६ ५,९४,१४७ ८७,७८५

औंढा ना. १३६ ४१९५७१ ८६९६५

सेनगाव १३७ ४८७६४१ ८३८७८

Web Title: Only 15% of the target of dense tree planting was achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.