२२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:33+5:302021-06-01T04:22:33+5:30
हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये ...
हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये चालक, वाहकाव्यतिरिक्त २२ प्रवासी बसविण्यात येऊन कोरोनाचे नियम पाळले जातील, अशी माहिती हिंगोली आगाराचे स्थानक प्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून एस.टी.महामंडळ कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. दीड वर्षात कोट्यवधींचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलावले जात आहेत. ज्यांना कामावर बोलावले नाही, अशांनी बाहेर न फिरता घरीच बसावे, असेही महामंडळाने कर्मचाऱ्यांना कळविले आहे. आजमितीस कोरोना महामारीमुळे डिझेलचा खर्चही निघणे अवघड होऊन बसले आहे. बसेस बाहेर नाही काढल्यास जागेवरच गंज खातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न महामंडळाला पडला आहे. आजमितीस तरी महामंडळ आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामंडळाने बसेस पर जिल्ह्यात सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून महामंडळ २४ मेपासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात यशस्वी झाले आहे. परजिल्ह्यातील प्रवासी भेटल्यासच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारी कमी आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच महामंडळाची बस पाठविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, असे महामंडळाने सांगितले.
आगारातून बस बाहेर काढते वेळेस सॅनिटायझर आणि पाण्याने स्वच्छ करून घेतली जात आहे. यासाठी काही ठराविक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच कर्मचारी आगारातून एसटी बाहेर सोडत आहेत. प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. बसमध्ये चढते वेळेस प्रवाशाला मास्क नसेल तर त्यास खाली उतरविण्यात यावे, अशीही सूचना चालक-वाहकांना देण्यात आली आहे.
शहर बस थांबे केले बंद .....
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बस थांबे बंद करण्यात आले आहेत. चालक-वाहकांनी बस थांब्यावर न थांबविता सरळ बसस्थानकात आणावी. यानंतर बसमधील प्रवाशांची चाचणी करून घरी सोडण्यात यावे, अशीही सूचना चालक, वाहकाला दिली आहे.
पर जिल्ह्यातील प्रवासी मिळाले तरच एस.टी. बसेस बाहेर सोडण्यात येत आहेत. अन्यथा जिल्हांतर्गतच बसेस सुरू आहेत, अशी माहिती कळमनुरीचे आगार प्रमुख अभिजित बोरीकर आणि वसमतचे आगार प्रमुख अनिल निकाळजे यांनी दिली.
उत्पन्न वाढीसाठी सर्वच जण प्रयत्नशील....
गत दीड वर्षापासून एस.टी. महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. अशा परिस्थितीत सर्वच कर्मचारी महामंडळाला प्रवासी कसे मिळतील याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे ड्यूटीवरील कर्मचारी मास्क घालून कामावर येत आहेत. सर्वांनाच कोरोनाचे नियम बंधनकारक केले आहेत.
-डी. आर. दराडे, एसटी कामगार सेना विभागीय सचिव