१४ पैकी ३ बँकांचेच १० टक्क्यांवर पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:35+5:302021-06-01T04:22:35+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर ...
हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर अजून पाच टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. खा. हेमंत पाटील यांनी नुकताच या बँकांना थेट इशारा दिला असला तरीही, आता अनेक बँकांच्या झालेल्या विलीनीकरणाचे विपरित परिणाम दिसण्याची भीती निर्माण झाली आहे.
पूर्वी जिल्ह्यात २० च्या जवळपास व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत बँका होत्या. त्यातील काहींचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे इतरांचे ग्राहक आता या बँकांमध्ये आले आहेत. मात्र अशा बँकांच्या शाखा बंद पडल्यानंतर ज्या बँकेत विलीन झाल्या, तेथील मनुष्यबळ फारसे वाढले नाही. त्यामुळे अनेकांना अजून त्या बँकांचे पूर्ण पीककर्ज ग्राहक सांभाळण्यात अडचणी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे हा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र एक दिवस दिल्यानंतरही कर्जवाटपाला गती न मिळण्याचे कारण कळायला तयार नाही. एक तर बँका या दिवशीही इतर कामे करीत असाव्यात अथवा बँकांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला गुंगारा देण्याची तयारी चालविली असावी, असे दिसत आहे.
इंडियन बँकेने ४ टक्के, बँक ऑफ बडोदाने ५.५५ टक्के, बँक ऑफ इंडियाने ४.९० टक्के, कॅनरा बँकेने ०.७१ टक्के, पंजाब नॅशनल बँकेने ७.६२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ६.६८ टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाने २.७५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रने १८ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १२.८८ टक्के, युको बँकेने १४.३९ टक्के, या दहा बँकांनी ३९८७ शेतकऱ्यांना ३८.६६ कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट मात्र ४२४ कोटी वाटपाचे आहे. तसेच ॲक्सिस बँकेने २.६३ टक्के, एचडीएफसीने २.४० टक्के, आयसीआयसीआयने ७.१७ टक्के, आयडीबीआयने ३.८४ टक्के कर्ज वाटप केले. या खासगी बँकांनी २९४ जणांना ४.९० कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट ८६ कोटी वाटपाचे आहे.
पाच बँकांच्या विलीनीकरणाचा भार
इंडियन बँकेत अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदामध्ये देना व विजया बँक, कॅनरा बँकेत सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक विलीन झाली. त्यामुळे आता या बँकांचेही पीककर्ज खातेदार या नव्या बँकांना सांभाळावे लागणार आहेत.
मध्यवर्ती बँक टॉपवर
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५ हजार १९८ शेतकऱ्यांना ४२.२५ कोटींचे कर्जवाटप करून ३५ टक्के उद्दिष्ट गाठले, तर ग्रामीण बँकेने यंदा ५९० शेतकऱ्यांना ५.०८ कोटीचे वाटप केले असून ही बँक मागे पडल्याचे दिसत आहे.