राज्यात ३१ टक्के शेतकऱ्यांचीच माहिती ‘पीएम-किसान सन्मान’मध्ये अपलोड; दोन हजारांचा पहिला हप्ताही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:32 PM2019-07-03T15:32:55+5:302019-07-03T15:39:41+5:30
विधानसभेपूर्वी तरी पहिला हप्ता मिळणार का?
- विजय पाटील
वसमत (जि.हिंगोली) : किसान सन्मान योजनेचा लोकसभा निवडणुकीमुळे गडबड करून शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले होते. मात्र तरीही राज्यातील केवळ ३५.१६ टक्के शेतकऱ्यांचीच माहिती वेबसाईटवर अपलोड झाली आहे. यात नागपूर विभाग सर्वांत मागे आहे. आता विधानसभेपूर्वी तरी पहिला हप्ता मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या कामाला फेब्रुवारी २0१९ मध्ये प्रारंभ झाला होता. मार्च महिन्यात सहा हजारांपैकी दोन हजारांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा झाली होती. मात्र प्रातिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा झाली. नंतर ती काढूनही घेण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. पूर्वी या योजनेत १.४२ लाख कुटुंबांची माहिती अपलोड करायची होती. केवळ अल्पभूधारकांचाच म्हणजे २ हेक्टर जमीनधारणा असलेल्या कुटुंबालाच हा लाभ मिळणार होता. आता बहुभूधारकांचाही समावेश करण्यात आला आहे. केवळ कर्मचारी, लोकप्रतिनिधीच बाजूला राहणार आहेत. योजनेची व्याप्ती वाढल्याने हिंगोलीत २.३२ लाख कुटुंबांची माहिती वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर केल्याने १.३८ लाख पात्र कुटुंबांचीच माहिती अपलोड झालेली आहे. आता ९३ हजार ७८५ कुटुंबांची माहिती भरणे शिल्लक आहे. यापैकी ७४८0 कुटुंबांची माहिती २ जुलैला वेबसाईटवर भरली. तर ३५ हजार २६८ कुटुंबांची माहिती तयार आहे. हिंगोली जिल्ह्याचे लाभार्थ्यांच्या तुलनेत ३७.६१ टक्के काम पूर्ण झाले आहे.
योजनेची व्याप्ती वाढल्याने पेन्शनसाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खात्यावर पहिला हप्ता जमा होईल की नाही, याची चिन्हे दिसत नाहीत. जिल्ह्यातील विविध भागातून मागील काही दिवसांपासून या योजनेतील पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी निवेदने प्रशासनाला सादर झाली होती. मात्र थेट एनआयसीकडून आॅनलाईन रक्कम खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जाते.
नागपूर महसूल विभाग सर्वांत मागे
राज्यातील १.0५ कोटी शेतकरी कुटुंबांची माहिती वेबसाईटवर अपलोड करायची आहे. यापैकी ५२.९३ लाख कुटुंबांची माहिती अपलोड झाली आहे. तर तेवढीच शिल्लक आहे.यात महसूल विभागनिहाय कोकण-१४.३६ टक्के, नाशिक-५२ टक्के, पुणे-४६.३६ टक्के, औरंगाबाद-२८.८७ टक्के, अमरावती-४२.९३ टक्के तर नागपूरमध्ये ८.८२ टक्के माहिती अपलोडिंगचे काम झाले आहे. राज्यात सर्वांत पुढे नाशिक तर मुख्यमंत्र्यांचा नागपूर महसूल विभाग सर्वांत मागे आहे. राज्यात ८५ टक्के माहिती अपलोड करून अव्वल नंदुरबार आहे. सर्वांत जास्त ५.७४ लाख कुटुंबांची माहिती सोलापूरला अपलोड करायची असून ६७.१२ टक्के काम पूर्ण झाले आहे.