मग्रारोहयोच्या कामांवर केवळ ५00 मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 AM2018-10-17T00:45:54+5:302018-10-17T00:46:06+5:30
काही भागात असलेली दुष्काळजन्य स्थिती, सोयाबीनचा संपलेला हंगाम. यामुळे शेतमजूर आता स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कूच केल्याचे चित्रही दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : काही भागात असलेली दुष्काळजन्य स्थिती, सोयाबीनचा संपलेला हंगाम. यामुळे शेतमजूर आता स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कूच केल्याचे चित्रही दिसून येत आहे.
यंदा रबीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे विविध भागातील शेतमजुरांना सोयाबीननंतर कोणतेच शाश्वत रोजगाराचे साधन दिसत नाही. अनेकांनी यंदा मजुरीसाठी शहरी भागाकडे धाव घेतली आहे. काही भागातच सोयाबीन काढणीला मजूर लागत असले तरीही बहुतांश भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी मिळेल ते काम करण्यासाठी मोठ्या शहरांकडे कूच करणे सुरू केले आहे. बांधकाम, खोदकाम करण्यासाठी मोठ्या शहरात गेल्यास मग्रारोहयोपेक्षा जास्त मजुरी मिळते म्हणून ठरावीक मजूर तर या कामाकडे कायम पाठ फिरवितात. मात्र ज्यांना रबीच्या पिकांची थोडीबहुत आशा असते व ठरावीक रिकाम्या काळात कामाची गरज असते, अशा मजुरांना मग्रारोहयोच्या कामांशिवाय पर्याय नसतो. मात्र ही कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायती उदासीन असल्याने अशा मजुरांचाही हिरमोड होत आहे. यंदा काही भागात तर सरसकट सर्वांनाच बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यातच अनेकांना दिवाळीपर्यंत गावात थांबायची इच्छा असली तरीही हाताला काम नसल्यास सण कसा साजरा करायचा? या कारणाने त्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे. दिवाळीनंतर कुटुंबासह स्थलांतर करण्याचीही तयारी केली जात आहे. डोंगराळ भागात तर अतिशय विदारक चित्र आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतींसह विविध यंत्रणांनी सुरू केलेल्या कामांची संख्या अवघी ११४ आहे. यात २९ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केली आहेत. यामध्ये औंढ्यात ३ ग्रा.पं.च्या ७ कामांवर ३२, वसमतला २ ग्रा.पं.च्या १५ कामांवर ६0, हिंगोलीत १0 ग्रा.पं.च्या १४ कामांवर १0९, कळमनुरी तालुक्यात ६ ग्रा.पं.च्या ६८ कामांवर १९४, सेनगाव तालुक्यात ८ ग्रा.पं.च्या १0 कामांवर १७९ मजूर आहेत.