आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:05+5:302021-01-13T05:18:05+5:30

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या ...

Only after the arrest of the accused will the chain of 'that' case be revealed | आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

आरोपीच्या अटकेनंतरच ‘त्या’ प्रकरणाची साखळी होणार उघड

Next

वसमत : मयत झाल्यानंतर १३ वर्षांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज देण्याचा प्रताप युनियन बँकेच्या वसमत शाखेने केला. बनावट कर्ज देणाऱ्या साखळीने असे अनेक कारणामे केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ जणांवर वसमत येथे गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपींना पकडून चौकशीची गरज आहे. या चौकशीतच साखळी उघड होऊ शकते. आरोपी फरार दाखवण्याची परंपरा कायम राहते की प्रत्यक्ष अटक करून चौकशी होते यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

वसमत तालुक्यातील चोंढीतर्फे सेंदुरसना येथील मयत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलण्यात आल्याची तक्रार म. बशीर नदाफ यांनी पोलिसांत दिली. सर्व पुरावे कागदपत्रे देऊनही वर्षभर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. लोकशाही दिनात तक्रार दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना तक्रारी पाठवल्या. तक्रारीची चौकशीही होत नव्हती. तक्रारदाराने वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज उचलण्याचे हे एकच प्रकरण नसून बनावट परस्पर कर्ज उचलण्याचे अनेक प्रकार घडल्याची तक्रारदारांची तक्रार आहे. याप्रकरणातील आरोपीत युनियन बँकेचे शाखाधिकारी, रोखपाल, खाते तपासणीस, दुय्यम निबंधक डफडे, तलाठी संजय वाहिले, मंडळ अधिकारी केशव अंभोरे, बनावट आधार कार्ड बनवून देणारे आदी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये असलेले दुय्यम निबंधक हे सध्या अकलूज येथे कार्यरत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे ते फरार असल्याचा प्रश्न येत नाही. पोलिसांनी आता या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची गरज आहे. अटकपूर्व जमानतीसाठी रस्ता मोकळा राहिला तर बनावट कर्ज प्रकरणाचे रॅकेट गुलदस्त्यात राहण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना गंडवणारी टोळी वसमतमध्ये कार्यरत आहे. यात अनेक प्रतिष्ठित म्हणवणारेही आहेत. अधिकाऱ्यांसोबत राहणारे पोट कर्मचारी व वसुलीसाठी सुरक्षित म्हणून नियुक्त असलेले खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून अधिकारीही अशा प्रकरणात हात धुऊन घेत असतात. कोणी तक्रार दिली तर टोलवाटोलवी करून तक्रारदारालाच त्रस्त केले जाते. एखादाच तक्रारदार प्रकरण लावून धरतो. याप्रकरणातही तसेच घडले आहे. आता तरी चौकशी योग्य पद्धतीने करून आरोपी गजाआड हाेणे अपेक्षित आहे. तरच घोटाळ्याची साखळी उजेडात येऊ शकते.

याप्रकरणी तक्रारदार म. बशीर नदाफ यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत शहर पोलिसांनी वर्षभर टाळाटाळ केल्याचे सांगितले. तक्रार नोंदविण्यासाठी जो विलंब झाला तो चौकशीत होणार नाही, यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आरोपी मोठे अधिकारी असल्यामुळे फरार दाखविण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जमानत झाली तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची साखळी उजेडात येणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

Web Title: Only after the arrest of the accused will the chain of 'that' case be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.