जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ २०० रूपये दाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:44+5:302021-05-21T04:30:44+5:30
कोरोना संसर्ग रोख्णयासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही रात्रंदिवस कामाला लागली आहे. कोरोना रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी कोरोना केअर ...
कोरोना संसर्ग रोख्णयासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही रात्रंदिवस कामाला लागली आहे. कोरोना रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यात १९ मे पर्यंत १५ हजार ४९ रूग्ण आढळून आले. त्यापैकी १४ हजार १९९ रूग्ण बरे झाले असून आतार्यात ३२१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रूग्ण बरे होण्यात डॉक्टर, नर्स, यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. साफसफाईपासून ते मृतदेहाची पॅकींग करण्यापर्यंतची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. यात त्यांचा संबध थेट कोरोनाबाधित रूग्णांशी येत आहे. जीवावर उदार होऊन मृत रूग्णांचे मृतदेह हाताळावे लागत असतानाही त्यांना दिवसाला केवळ २०० रूपये मानधन मिळत आहे. त्यातच त्यांच्या जेवणाची व राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे २०० रूपयांत संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. जिल्ह्यात जवळपास ५१२ कंत्राटी कर्मचारी असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पोट भरेल एवढे पैसे द्या, नोकरीत कायमस्वरूपी घ्या !
-कोरोना काळात जीवावर उदार होऊन मृत्यूच्या दाढेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत दाम मात्र खुपच कमी मिळत आहे. त्यामुळे किमान पोट भरेल एवढे तरी पैसे द्यावेत, अशी मागणी आहे.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घ्यावे,
- तसेच त्यांचा विमा काढावा आदी मागण्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत.
काय असते काम ?
कोरोना वार्डात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामासोबतच मृतदेहाची पॅकींग करणे, मृत रूग्णांच्या नातेवाईकांना माहिती देणे, मृतदेह रूग्णवाहिकेत ठेवणे आदी कामे करावी लागत आहेत. तसेच एखाद्या वेळेस बाहेरून औषधीही आणून द्यावी लागत आहे.
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टींग : तरी कामाचे मोल नाही
कंत्राटी कर्मचाऱ्यांना साफसफाईसह मृतदेहाची पँकींग, शिफ्टींग सारखी धोकादायक कामे करावी लागत आहेत. मात्र त्या तुलनेत पैसे मिळत नाहीत. त्यामुळे घर चालेल एवढे तरी पैसे देवून कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे.
-प्रफुल भोंडवे, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची पॅकींग करण्याचे काम करावे लागते. शिवाय वेळप्रसंगी स्वच्छतेसह इतरही कामे करावी लागत आहेत. त्यामुळे किमान मानधन जास्त दिल्यास घर चालविण्यास मदत होईल.
- शुभम वाव्हूळ, कंत्राटी कर्मचारी
कोविड सेंटरमध्ये काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कोरोना रूग्णांशी थेट संबध येत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासनाने विमा काढून कायमस्वरूपी नोकरीवर घ्यावे.
-अजय रोडगे, कंत्राटी कर्मचारी
कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत पैसे कमी मिळत आहेत. यात घर चालविणे अवघड बनले आहे. त्यामुळे मानधन वाढवून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे.
-शेख सोहेल, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे
५१२
दिवसाला रोजगार
२००
कंत्राट ३ महिन्याचे