शेतीसाठी यापुढे फक्त ‘सौर कृषीपंपच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:06 AM2019-01-25T00:06:27+5:302019-01-25T00:06:47+5:30
यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणला नवीन वीज जोडणी देण्यासाठी दुर्गम भागात येणाऱ्या अडचणी व त्यावरील खर्च परवडत नसल्याने हा उपाय केला आहे. ३१ मार्च २0१८ पर्यंत कोटेशन भरूनही कृषी जोडणी न मिळालेल्यांना यातच लाभ दिला जाणार आहे. नुकतेच एव्हीडीएस योजनेत ५१0२ कृषीपंपांना वीजजोडणीस मंजुरी मिळाली होती. यातीलही ६00 मीटरच्या आतील कामांची जोडणी दिली जाईल. उर्वरितांना सौरकृषीपंप देणार आहोत.
या योजनेत नव्याने अर्ज करण्यासाठी ५ एकरापर्यंतच्या शेतकºयास ३ एचपी तर त्यापेक्षा जास्त शेती असल्यास ५ एचपीचा सौरपंप दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयाकडे शाश्वत जलस्त्रोत असावा, अर्ज आॅनलाईन करावा लागेल, त्यात सातबारा, आधार, जवळच्या ग्राहकाचा क्रमांक आदी बाबी भराव्या लागणार आहेत. त्यामुळे कृषी वीजजोडणीसाठीही नवीन अर्ज करण्याचा विचार करणाºयांनी थेट याच योजनेत अर्ज करावा. यात सर्वसाधारण ग्राहकांना अडीच लाखांच्या युनिटसाठी दहा टक्के म्हणजे २५ हजार पाचशे रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना पाच टक्के म्हणजे १२ हजार ५00 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम अनेकांना जास्त वाटत असली तरीही यात कृषीपंप मिळणार असल्याने तो खर्च वाचणार आहे. शिवाय यापुढे वीजबिलाचे झंझट राहणार नाही.
दिवसा वीज मिळेल. कंपनी पाच वर्षांचा इन्शुरन्स काढणार आहे. शिवाय चोरी झाल्यास पोलिसांत तक्रार दिली की, विमा कंपनीकडून साहित्य मिळेल. त्याचबरोबर बिघाड झाल्यास महावितरणकडे तक्रार केल्यावर तीन दिवसांत दुरुस्ती करून मिळेल.
हा पंप २५ वर्षांपर्यंत चालू शकतो, असा दावाही महावितरणकडून काढण्यात आलेल्या माहितीपुस्तिकेत केला आहे. तर आॅनलाईन अर्ज करण्यास काही अडचण आल्यास १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले.