शांत राहणे हाच रागावर रामबाण उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:15 AM2019-01-23T00:15:05+5:302019-01-23T00:15:22+5:30
रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.
तुम्मोड म्हणाले, राग हा क्षणिक असतो. तो राग आपण त्या क्षणापुरता थांबवला तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात. तो वेळ टाळून नेला म्हणजे पुढील कटूता टाळता येते. प्रशासकीय सेवेत काम करताना स्वअनुभवानेच सांगायचे तर बऱ्याचदा अपेक्षितरीत्या काम न झाल्यावर राग येतो. मात्र अशावेळी समोरचा अधिकारी-कर्मचारी आधीच दडपणाखाली असल्याने राग करून चालत नाही. त्यामुळे रागावर मात करून मन शांत ठेवून त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याची कसरत करावी लागते.
माणसाच्या जीवनात प्रसंगानुरुप सर्व प्रकारच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपोआप उचंबळून येतात. मात्र सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यावर नियंत्रण ठेवल्यासच चांगल्या कामाची उभारणी करता येते. त्यामुळेच सामाजिक स्वास्थ्यही टिकते. हाती घेतलेल्या कामात यश येते. समाजाचाही अशा बाबींना पाठिंबा मिळतो. त्यामुळे यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संयम. ज्याच्याकडे संयम आहे, त्याला कटू प्रसंग टाळणे शक्य होते.
लोकमतने गुड बोला, गोड बोला हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. तो प्रत्येकाने अंगिकारावा असे मी आवाहन करतो. शिवाय त्यामुळे एका चांगला सामाजिक बदल दिसून येईल. एकप्रकारे आजच्या काळाची गरज म्हणून हा उपक्रम म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.