विधान परिषदेच्या नुसत्या वायफळ चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:26 AM2018-05-18T00:26:19+5:302018-05-18T00:26:19+5:30
: परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे. आचारसंहितेमुळे इतर कोणतीच कामे करता येत नसल्याने रिकाम्या बॅगा, उपाशी बैठकांच्या चर्चा रंगत आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया व भाजप बंडखोर सुरेश नागरे हे मैदानात राहिले आहेत. दिग्गज उमेदवार पाहता घोडेबाजार चांगलाच वधारणार अशी शक्यता आधी होती. मात्र अजूनही त्या दिशेने कोणाचेच पाऊल पडत नसल्याने मतदारराजा चांगलाच भांबावला आहे. काहीजण तर परिस्थिती अशीच राहिली तर पडिकाला साथ देऊ, अशा वल्गना करू लागले आहेत. जि.प., न.प.च्या निवडणुका महागात पडलेल्यांना तर त्यावरून आमचा योग्य सन्मान व्हावा, असे वाटत आहे. परंतु हे होणे शक्य नसले तरीही सन्मानासाठी पक्षनिष्ठेलाही तिलांजली देण्याची अनेकांची तयारी दिसू लागली आहे. त्याचे परिणाम येत्या चार-पाच दिवसांत दिसू लागतील, असे वाटत आहे. काहींनी तर पडिकाला साथ द्यायची की कसे? हा शब्दप्रयोग परवलीचा बनविला आहे. तसे झाल्यास या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र तूर्त तरी आंबे, रिकाम्या बॅगा बऱ्या की, उपाशीपोटी बैठकांना हजेरी लावणे बरे यावरच पक्षीय मंडळी एकमेकांची उणी-दुणी काढून मनोरंजन करीत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकत्रित बळ जास्त असले तरीही घोडेबाजाराची लागण झाल्यास अवघड आहे. मात्र भाजपची जागा सेनेने हिरावल्याने त्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. यात अंतर्गत गणितांमध्ये दोन्हीकडूनही एकमेकांना सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. मात्र पडद्याआडच्या या हालचाली आहेत. त्यात कोण किती यशस्वी झाला, हे सांगणे अवघड आहे. प्रयत्न मात्र भक्कमपणे सुरू आहेत.
एकमेकांच्या संपर्कात
जिल्ह्यातील विविध भागातील मतदार उमेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. भेटी-गाठीत काही चांगभले झाले काय? याची विचारणा होत आहे. वसमत, हिंगोली, औंढा, सेनगाव, कळमनुरीतून एकमेकांना संदेश दिला जात आहे. मात्र सगळीकडेच ‘टंचाई’चा माहौल असल्याने आपापल्या परीने स्थानिक कारभारात मन गुंतवून ठेवले जात आहे.
शॉक ट्रीटमेंटचा धोका
या निवडणुकीत सगळेच संथ गतीने पावले टाकत असले तरीही शेवटच्या टप्प्यात शॉक ट्रीटमेंटचा धोकाही नाकारता येत नाही. यापासून सावध राहावे लागणार आहे.