मोकळा प्लॉट, शेती सांभाळणे झाले कठीण ; अडीच वर्षात १४ गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:16+5:302021-06-23T04:20:16+5:30
हिंगोली : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोकळा प्लाॅट घेतला जातो; मात्र मोकळा प्लॉट सांभाळणे कठीण झाले असून बनावट कागदपत्रे ...
हिंगोली : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोकळा प्लाॅट घेतला जातो; मात्र मोकळा प्लॉट सांभाळणे कठीण झाले असून बनावट कागदपत्रे तयार करून माफीया असे मोकळे प्लॉट हडप करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. शेतीवरही असेच अतिक्रमण होत असून मागील अडीच वर्षात जिल्हाभरात १४ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच काही जण भविष्यात प्लॉटची दुप्पट किंमत मिळेल, या आशेने मोकळे प्लॉट विकत घेतात. अनेक महिने मोकळ्या प्लॉटकडे पाहतही नाहीत. त्यामुळे हे प्लॉट रिकामेच राहत असल्याने यावर भूखंड माफिया अतिक्रमण करीत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून मोकळा प्लॉट दुसऱ्यांना विक्री करण्याची किमयाही पार पाडत आहेत. त्यामुळे मोकळा प्लॉट हडप केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्लाॅटसारखेच शेतीबाबतही प्रकार उद्भवत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे करीत शेती बळवकाल्याचे प्रकारही घडत आहेत. मागील अडीच वर्षात जिल्हाभरात १४ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मोकळा प्लॉट व शेतीही सांभाळणे कठीण बनले आहे.
एकच प्लाॅट अनेकांना विकला
हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील एकाचा प्लॉटची बनावट कागदपत्रे बनवून दोघांना विक्री केल्याचा प्रकार याच आठवड्यात उघडकीस आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. असे प्रकार अन्य ठिकाणीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धंद्यात पारंगत असलेल्या भूखंड माफियांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे अनेकजणांना चांगलाच त्रास सहन करावा लागल्याचेही बोलले जात आहे.
प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी
प्लाॅटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ सिमेंटचे खांब रोवून तार कुंपण करून घेणे आवश्यक आहे. तसेच पक्की नोंदणी करणेही गरजेचेची आहे. याशिवाय प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कोणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास प्लॉट बळकावण्याच्या प्रकारांना आळा बसू शकतो.
प्लॉट घेताना मागील कागदपत्रे तपासूनच खरेदी करावा. तसेच प्लॉट घेतल्यानंतर पक्की नोंदणी करून मोकळ्या प्लाॅटवर चहूबाजूंनी तारकुंपण करून घ्यावे. तसेच प्लॉट खरेदी केलेल्यांनी आपल्या नावाची पाटी लावावी. यामुळे प्लॉटवर अतिक्रमण होणार नाही.- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली
प्लॉट खरेदी केल्यानंतर खरेदीदाराने त्या मोकळ्या जागेवर तारेचे कुंपण करून आपला प्लॉट संरक्षित करावा. त्यावर कोणी अतिक्रमण करणार नाही, याची काळजी घ्यावी. यापूर्वी तसा शासन आदेशही निघाला आहे.
- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न.प. हिंगोली.
पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
२०१९ - ०८
२०२०- ०३
२०२१ -०३