हिंगोलीत ऑपरेशन धरपकड, रात्रीतून बांधल्या १४ जणांच्या मुसक्या
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: December 13, 2023 04:00 PM2023-12-13T16:00:16+5:302023-12-13T16:01:00+5:30
१६ ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.
हिंगोली : जिल्हाभरात १२ डिसेंबरच्या रात्री एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. रेकॉडवरील व सराईत गुन्हेगारांसह जवळपास १४ जणांना पोलिसांनी पकडले. यात अटक वॉरंट निघालेल्या २१ जणांना अटक वॉरंट तामील करण्यात आले.
जिल्हाभरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रात्री १६ ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. बुधवारी पहाटेपर्यंत चाललेल्या कार्यवाहीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही करण्यात आली. यात हिंगोली शहर, वसमत शहर, वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते. व ज्यांच्याबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले अशा एकूण २१ अटक वॉरंट तामील करण्यात आले. हद्दपारीचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या एकास पकडण्यात आले. एका दारू विक्रेत्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके, सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक विकास पाटील, पडळकर, चंद्रशेखर कदम, रणजित भोईटे आदींच्या पथकाने केली.