कळमनुरी तालुक्यात ८५ हेक्टरवर फळबाग लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:39+5:302021-01-08T05:38:39+5:30
कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत ...
कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत तालुक्यात ८५.१० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा ,लिंबू ,पेरू आदी फळबाग पिके ६५ लाभार्थ्यांनी ५० हेक्टरवर लावली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा, पेरू, आदी फळबाग पिके ४८ शेतकऱ्यांनी ३५.१० हेक्टरवर लावली आहेत. यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात रब्बीचे ३६ हजार ६८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १५२.२४ हेक्टरवर झालेली आहे. तालुक्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्टर असून, ४० हजार ६५६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १९९.४६ हेक्टरवर झालेली आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ११०.५९ टक्के आहे. या हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रब्बीचा पेरा वाढलेला आहे. गहू व हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र वाढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी दिली.
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव
मागील आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी या अळीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. पूर्ण वाढलेल्या रोपांची संख्या सरासरी चौरस मीटर क्षेत्रात दोन-तीन अळ्या आढळल्यास किडीचे नियंत्रण करावे. बदलत्या हवामानामुळे रब्बी व फळबाग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. हरभरा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर मावा कीडा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.