‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:10 PM2018-12-21T23:10:46+5:302018-12-21T23:11:14+5:30
जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय पुनर्विलोकन बैठकीत जिल्हाधिकारी जयंवशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील आदी उपस्थित होते. जयवंशी म्हणाले, बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घेऊन दोषींविरुद्ध पोलीस विभागामार्फत रीतसर कारवाई करावी. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांतील दोषी आरोपी पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरोग्य व पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिल्या. जवळील परिसरात कुठलीही मान्यता प्राप्त पदवी नसताना एखादी व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास सदर गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांनी त्वरित तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना कळवावे. अन्यथा संबंधितांवर सहआरोपी म्हणून जबाबदार धरून कडक कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. जनतेने सतर्क राहून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांकडून कोणतेही औषधोपचार घेऊ नये, असे आवाहनही जयवंशी यांनी केले.
महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ मधील कलम ३७ खालील तरतुदीच्या आधारे ग्रामीण भागात व्यवसाय करण्यास अनुमती देता येत असल्याची माहिती देऊन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरविरुध्द केलेल्या कारवाईचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी बैठकीत सादर केला.