१६ जानेवारीला लसीकरणार्थ सज्ज राहण्याचे दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:11+5:302021-01-13T05:18:11+5:30
हिंगोली : कोरोनाच्या लसीकरणासाठी टप्पानिहाय मोहीम राबविण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी लसीकरण करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश ...
हिंगोली : कोरोनाच्या लसीकरणासाठी टप्पानिहाय मोहीम राबविण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी लसीकरण करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.
कोरोनाचा कहर अजूनही कमी झाला नाही. या आजाराची दहशत कायम आहे. मागील काही दिवसांपासून त्यावरील लसीची प्रतीक्षा होती. आता ती लस आली असून, टप्प्याटप्प्याने ती दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनात काम करणाऱ्या व महत्त्वाचा घटक मानला जाणाऱ्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. शासकीय व खासगी दोन्हींचाही यात समावेश आहे. यासाठी ६,५०० जणांची नोंदणी झाली आहे. अजून लसींचा साठा उपलब्ध झाला नाही. मात्र, तो लवकरच मिळेल, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. १६ जानेवारीला लसीकरण करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश आहेत.
हिंगोली जिह्यात चार बुथ शासनाने निवडले आहेत. जिल्ह्याचा आकार लसीकरणाची संख्या यावर ही निवड केली आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत व प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा हे ते चार बुथ आहेत.
हे केंद्र जवळ पडेल, अशा सर्व डाॅक्टर व आराेग्य कमर्मचाऱ्यांना या बुथवर लस दिली जाईल. इतरांना ती तूर्त मिळणार नाही.
लसीकरण कोणाला व कधी?
लसीकरणाचा हा पहिला टप्पा आहे. यामध्ये फक्त आरोग्य विभागातील डाॅक्टर व प्रत्यक्ष काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. १६ जानेवारी रोजीची तयारी करण्यास शासनाने सांगितले असले, तरीही अजून त्यावर काम सुरू आहे.
अनेक टप्प्यांत होणार लसीकरण
कोरोनाचे लसीकरण एकदाच पूर्ण करणे शक्य नाही. आधी आरोग्य यंत्रणा, नंतर वृद्ध व गंभीर आजाराचे रुग्ण, त्यानंतर प्रमुख भूमिका निभावणारी शासकीय यंत्रणा व नंतर इतरांना ही लस असे टप्पे दिसत आहेत.
शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार आराेग्य विभागाने बुथची स्थापना केली. रंगीत तालिमही झाली. अजून लसीकरणाची निश्चित तारीख आली नाही. मात्र, यंत्रणा सज्ज आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- डाॅ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक