इन्शुरन्ससाठी मालकानेच रचला कार पळविल्याचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 07:23 PM2019-03-20T19:23:49+5:302019-03-20T19:24:20+5:30
कारमालकाने याची कबुली दिली असून सध्या तो ५ दिवस पोलीस कोठडीत आहे.
कळमनुरी (जि. हिंगोली) : इन्शुरन्सवर नवीन कार मिळण्यासाठी कार मालकानेच कार पळविण्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. कारमालकाने याची कबुली दिली असून सध्या तो ५ दिवस पोलीस कोठडीत आहे.
पुसद येथील मनोज श्रावण राठोड यांनी त्यांची कार क्र. एमएच-२९- बीसी ४२१८ ही चालक अविनाश वानखेडे यांना परभणी येथील किरायाने आहे. तो घेवून जा असे म्हणाला. कारमध्ये ८ फेब्रुवारी रोजी पुसद येथून तीन प्रवासी घेवून निघाला. तुप्पा फाट्याजवळ आल्यानंतर या तिघांनी चालकांना चाकुचा धाक दाखविला. चालकाच्या डोळ्यात मिरचीचे पावडर टाकले व मारहाण केली व जबरीने चाबी हिसकावून चालकाला औंढा नागनाथ येथे पेट्रोलपंपाजवळ फेकून दिले कारसह मोबाईल घेऊन पसार झाले.
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चालक फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आला. तिघा अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हाही दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता हा प्रकार घडला नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. तेव्हा पोलीसांचा संशय बळावला. त्यांनी कारचालकाला बोलावून पुन्हा सखोल केली व पोलीस खाक्या दाखवताच चालकाने खरी हकीकत सांगितले.
हा कार पळविल्याचा प्रकार खोटा व बनावटी असून कार मालक मनोज श्रावण राठोड याने केला असल्याचे सांगितले. त्यानंतर १७ मार्च रोजी फौजदार शिवसांब घेवारे, जमादार गुलाब खरात, शिवाजी पवार यांनी कार मालकाला पुसद येथून ताब्यात घेतले. त्यालाही पोलिसी खाक्या दाखवताच आपण इन्शुरन्समधून दुसरी कार घेण्यासाठी हा बनावटी नाटक केले. दुसरी नवीन कार उचलून पहिली कार दुसऱ्या नंबरवर चालवायचे असा माझा हेतू होता. असे सांगितले. त्याने कार पळविल्याचे बनावटी नाटक आपण रचल्याचे कबूल केले.
न्यायालयाने सुनावली कोठडी
पळवून नेलेली कार, उस्मानाबाद, लातूर रोडवर सोडण्यात आली होती. उस्मानाबाद पोलिसांनी बेवारस कार रस्त्यावर असल्याचे सांगितले. कळमनुरी पोलिसांनी ही कारही ताब्यात घेतली. १८ मार्च रोजी कार मालक मनोज श्रावण राठोड याला येथील न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोनि जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार घेवारे हे करीत आहेत.