हिंगोलीत पालांवरील शाळाबाहेरच्या मुलांना जिल्हा परिषदेने दिले थेट प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:56 PM2018-02-06T23:56:48+5:302018-02-07T11:38:18+5:30
सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला.
हिंगोली : सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाळाबाह्य मुलांचा शोध’ मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेत गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे, गट समन्वयक एम. एम. केंद्रेकर, सुदाम गायकवाड, एस. डी. मंगनाळे, मोरे, माद्रप, कडू तसेच समता कक्षाची यंत्रणा सहभागी होती. हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातील पालावर जाऊन पथकाने भेट दिली. यावेळी बालकांना शाळेत न पाठविणा-या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. मुलांना नियमित शाळेत पाठविण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
हिंगोली शहरासह ग्रामीण भागात जाऊन पथकाद्वारे मुलांचा शोध घेण्यात आला. जवळपास १५ शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळील शाळेत प्रवेश देण्यात आला. तसेच शहरालगतच्या बळसोंड पसिरातही मोहीम राबविण्यात आली. दिवसभर शोध मोहीम सुरू होती. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांच्या गट शिक्षणाधिका-यांना शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ शाळेत दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.