कर्तव्यदक्षतेला सलाम! आधी बस सुरक्षित उभी केली; नंतर चालकाने सोडले प्राण
By रमेश वाबळे | Published: November 30, 2023 03:30 PM2023-11-30T15:30:43+5:302023-11-30T15:32:19+5:30
हिंगोली आगाराच्या चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
हिंगोली : बसफेरीदरम्यान चालकाला हृदयविकाराचा झटका आला. परंतु, स्वत:ला सावरत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. चालकाच्या या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे प्राण वाचले. मारोती हनुमंत नेमाणे (वय ५४, रा.संतूक पिंपरी) असे मयत चालकाचे नाव आहे
हिंगोली आगाराचे चालक मारोती नेमाणे व वाहक रेखा चांदणे हे सकाळी ६ वाजता एम.एच.०६ एस ८८०३ या मानव विकासच्या बसद्वारे हिंगोली ते धानोरा फेरीसाठी गेले होते. यादरम्यान शालेय विद्यार्थिनींना घेऊन त्यांनी शाळेत पोहोचविले. त्यानंतर धानोराहून ते हिंगोलीकडे निघाले. यादरम्यान बसमध्ये १५ ते २० प्रवासी बसले होते. ही बस सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ आली असता चालक मारोती नेमाणे यांना अचानक छातीत त्रास सुरू झाला. काही कळण्याच्या आतच त्रास वाढला. परंतु, स्वत:ला सावरत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षीत उभी केली. त्यानंतर त्यांनी बसच्य स्टेअरिंगवरच डोके ठेवले. यावेळी वाहक रेखा चांदणे यांनी प्रवाशांच्या मदतीने चालक नेमाणे यांना तात्काळ हिंगोली येथील एका खासगी रूग्णालयात आणले. परंतु, या ठिकाणी डाॅक्टरांनी मारोती नेमाणे यांना मृत घोषीत केले.
घटनेची माहिती कळताच हिंगोली आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख यांनी रूग्णालयात धाव घेतली. मयत चालक नेमाणे यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे. नेमाणे यांच्या मृत्यूने बस आगारातील कर्मचाऱ्यांसह संतूक पिंपरी येथे शोककळा पसरली आहे.