फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:32 PM2022-06-14T16:32:32+5:302022-06-14T16:33:12+5:30
बहिण फोनवर सतत बोलते, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता
डोंगरकडा (हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील दोन सख्ख्या चुलत बहीण-भावाने आत्महत्या केल्याची घटना सोमवार व मंगळवारी घडली. ऐश्वर्या गोविंद पंडित (१८) व आनंद विलास पंडित (२८) अशी मृतांची नावे आहेत.
ऐश्वर्या हिला तिचा चुलत भाऊ आनंद पंडित याने ‘तू सतत फोनवर का बोलतेस’ म्हणून थापड मारली. थापड मारल्याचा राग सहन न झाल्याने तिने राहत्या घरी १३ जून रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आनंद पंडित याने बहिणीने आत्महत्या केली असून आपल्यावर नाव येईल, या भीतीपोटी त्यानेही डोंगरकडा येथील एका शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन १४ जून रोजी आत्महत्या केली.
या दोन्ही प्रकरणी पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, अमोल अडकीने यांनी घटनास्थळी भेट दिली. डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मोहसीन, प्रशांत स्वामी, बळी वाघमारे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.