रागामुळेच जवळची माणसे तुटतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:38 AM2019-01-15T00:38:54+5:302019-01-15T00:39:21+5:30
राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.
राग आणि त्याचा मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे माहित असतानाही अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून राग येतोच. परंतु हाच राग किती घातक असतो ! रागाच्या भरात अनेकांकडून गंभीर गुन्हे घडतात. म्हणजेच सामाजिक सलोख्यावरही रागाचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे याच रागाला आता मकरसंक्रांत सणातील गोडव्याच्या साह्याने हद्दपार करून सकारात्मक वाटचालीकडे पाऊल टाकण्याची सर्वांना जणूकाही संधीच असल्याचे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले. सणापुरताच गोडवा न राहता तो कायम राहावा हाच संक्रांतीचा उद्देश असतो. परंतु असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आप-आपसातले मतभेद कायमचे विसरण्याचा संकल्प केला पाहिजे. ते म्हणाले, राग आणि चिडचिडेपणामुळे माणसं तुटतात. मानसिक आरोग्य बिघडते. हृदयाचे ठोके वाढून विविध आजार जडतात. गंभीर म्हणजे मेंदूविकार किंवा रक्तदाबाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवावे, असा वैद्यकीय सल्लाही दिला.
रागाच्या भरात झालेल्या नुकसानीची इतिहासात अनेक उदाहरणे असतील. मात्र आज धावपळीच्या जीवनात राग अनेक आजारांना निमंत्रण देते. वैद्यकीय सेवेत असल्याने रोज या बाबी पाहतो. त्यामुळे लोकमतच्या गुड बोला, गोड बोला उपक्रम अंगीकारण्याची खरेच गरज आहे.