शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
By रमेश वाबळे | Published: January 18, 2024 07:44 PM2024-01-18T19:44:59+5:302024-01-18T19:45:11+5:30
शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन
हिंगोली : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने १८ जानेवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात चालली आहे. अनेक वेळा लागवडही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न सोडविण्याकडे सरकार कानाडोळा करीत असून, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
यात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, तसेच नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा प्रमुख उत्तमराव वाबळे, देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, प्रल्हाद राखुंडे, मुंजाराव बेंगाळ, महादराव चव्हाण, जनार्दन राखोंडे, खंडबाराव नाईक, शेषराव कदम, साहेबराव आसोले, डिगांबर आहेर, मुरलीधर कदम, कानबाराव पोले, बळीराम कागणे, रमेश गरड, परबतराव माने, नागोराव पडोळे, शेषराव राखोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलकांची खा. हेमंत पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.