परवानगी चौथी वर्गाची, भरविला पाचवीचा वर्ग; चुकीचे 'धडे' देण्याऱ्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:11 PM2023-04-29T12:11:10+5:302023-04-29T12:11:23+5:30
विद्यार्थ्यास बनावट गुणपत्रिका, निर्गमउतारा व टीसी दिल्याने उघडकीस आला प्रकार
- इस्माईल जहागिरदार
वसमत: शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेच्या सानिया उर्दू प्राथमिक शाळेस चौथी वर्गापर्यंतच मान्यता असताना तेथे चक्क पाचवीचे वर्ग भरव प्रवेश देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवरून जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील संस्थाचालकासह इतरांवर गुन्हा दाखल करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वसमत शहरातील सानिया उर्दू प्राथमिक शाळेस इय्यता १ ते ४ वर्गाची मान्यता असताना येथे इय्यता ५ वीचा वर्ग चालवीला. त्यावर्गातील एका विद्यार्थ्यास शाळेने बनावट गुणपत्रिका, निर्गमउतारा व टीसी देऊन ६ वी वर्गात प्रवेश पात्र असल्याचा शेरा दिला. मात्र, याबाबत पालक म.सलिम म.रहीम यांना संशय आला. त्यांनी शिक्षण विभागाकडे पडताळणी केली असता सत्यता समोर आली. यानंतर त्यांनी शाळेच्या चौकशीची मागणी केली होती. २०१६ मध्ये फौजदारी न्यायालय प्रथमवर्ग वसमत येथे तक्रारदार म. सलिम यांनी वकीला मार्फत याचिका दाखल केली होती.
यावर १५ एप्रिल रोजी न्यायधिश यू. सी. देशमुख यांनी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५६(३) नुसार संस्थाचालक अमजद हुसेन पठाण रा हिंगोली, शाहीन बेगम अब्दुल गफार रा वसमत, जाकेरा बेगम जियाऊलहक रा हिंगोली,शेख इब्राहिम चॉंद रा वसमत,शहेनाज बेगम सत्तार खॉ रा वसमत,सय्यद रहिम सय्यद सादेख रा वसमत,यांची चौकशी करत गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे,तक्रारदार म.सलिम यांच्या तर्फे अँड शेख आयाज, अँड शेख फयाज यांनी युक्तिवाद केला होता. २८ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पत्र प्राप्त होताच म.सलिम म.रहिम यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.