पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला, तरी आम्हांला काहीच वाटत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:15+5:302021-01-18T04:27:15+5:30
हिंगोली : पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले असताना दरवाढीच्या विरोधातली आंदोलने गेली कुठे? असा प्रश्न ...
हिंगोली : पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले असताना दरवाढीच्या विरोधातली आंदोलने गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खाद्य तेलाबरोबरच आता पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य मात्र चांगलाच भरडला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यानंतर तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे पेेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दर वाढल्यामुळे वाहने चालवावीत की नाहीत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पेट्रोल व डिझेलसोबत खाद्य तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. राज्य व केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर का कमी करत नाही?, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत? वेळेची बचत व्हावी म्हणून घेतलेली वाहने घरीच ठेवावीत का? हा मोठा प्रश्न अनेकांनाच पडला आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नाहीत? तर सनदशीर मार्गाने दरवाढी विरोधात आंदोलन केले जाईल, असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवराज सरनाईक यांनी सांगितले आहे.
पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे अनेकांनी आपली वाहने घरात ठेवून पायी चालणे पसंत केले आहे. मंडईत भाजीपाला आणणाऱ्या छोट्या टेम्पो चालकाला विचारले असता, ते म्हणाले की, भाजीपाला आणणेही परवडत नाही. माझ्याकडे बैलगाडी असल्यामुळे मी टेम्पो घरी ठेवून बैलगाडीने भाजीपाला मंडईत आणून टाकून छोट्या विक्रेत्याला विकून घरी परत जात आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल व खाद्य तेलाचे भाव वाढले आहेत. हे दर आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना परवडणारे नाहीत.
२०१७ मध्ये पेट्रोल ५१.५६ तर डिझेल ६२.६१, २०१८ मध्ये पेट्रोल ८१.१४ तर डिझेल ६९.८४, २०१९ मध्ये पेट्रोल ८१.२० तर डिझेल ६९.२३, २०२० मध्ये पेट्रोल ८९.५० तर डिझेल ७०.२१ आणि २०२१ मध्ये पेट्रोल ९२.३२ तर डिझेलचा दर ८१.३७ एवढा आहे. यामुळे वाढते पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हावेत, एवढीच अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
अतिरिक्त करामुळे पेट्रोलिमय पदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. राज्य व केंद्र सरकारने अतिरिक्त कर काही प्रमाणात कमी करून पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून जनतेस दिलासा द्यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर दरवाढीच्या विरोधात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.
-शिवराज सरनाईक, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, हिंगोली
पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे आमच्या रोजंदारीवर परिणाम होत आहे. या वाढलेल्या दरामुळे ऑटो जागेवरच ठेवावा लागत आहे. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई करून ठेवली असून आता पेट्रोलचे दरही वाढविले आहेत. दाद कुणाकडे मागावी?असा प्रश्न आहे. पेट्रोल दर राज्य सरकारने कमी केले नाहीत तर येत्या काही दिवसांत आंदोलन केले जाईल.
-भगवान बांगर, जय भगवान ऑटो महासंघ, हिंगोली
पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेच्या हिताकडे अजिबात पाहत नाही. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे बहुतांश ऑटोचालकांनी ऑटो चालविणे बंद केले आहेत. अशावेळी त्यांची उपासमार होत आहे. राज्य व केंद्र सरकारला याचे काहीही सोयरसुतक नाही. दोन-चार दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी केले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल.
-विजय शिंदे, तालुकाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान, हिंगोली
गत दहा-पंधरा दिवसांपासून पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शेतातील माल आणणे परवडेना झाले आहे. बैलगाडीने शेतीमाल जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे छोटे वाहन शेतीमालासाठी खरेदी केले. परंतु, आज ते पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्यामुळे घरीच ठेवावे लागत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे मुक्या जनावरांना बैलगाडीला जुंपावे लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावल्याचे पहायला मिळत आहे. भाजीपाला, शेतीमाल खेडेगावाहून आणणे आणि त्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोयीचे झाले होते. आजमितीस पेट्रोल व डिझेलचा भाव गगनाला भिडल्यामुळे घेतलेले छोटे वाहन घरीच ठेवण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेवरही परिणाम झाला असून वाहने कमी प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया चिंचोली येथील प्रमोद इंगोले या वाहनचालकाने दिली.
प्रतिक्रिया
पेट्रोल दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. ५० रुपयांत येणे-जेणे सहजपणे व्हायचे. परंतु, आज दर वाढ झाल्यामुळे १०० रुपये मोजावे लागत आहेत. महिनाभराचे केलेले नियोजन विस्कळीत होत आहे. सरकारने पेट्रोलची केलेली दरवाढ कमी केल्यास बरे होईल.
-अर्चना वानखडे, हिंगोली