शरीर भौतिक तर आत्मा आध्यात्मिक जगाचे मूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:17 AM2018-02-10T00:17:49+5:302018-02-10T00:17:52+5:30
जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.
हिंगोली येथील जवाहर रोडवरील शांतीनाथ जैन मंदिरातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, मानवाचे शरीर हे भाड्याचे घर आहे. तरीही माणूस इतरत्र भटकत जातो. शेवटी घराची आठवण येतेच. मोक्ष हेच आपले घर आहे आणि तेच सुखही आहे. आपण दु:खापासून सुटका मिळवून सुखाच्या स्थितीत येण्याचा निरंतर प्रयत्न करतो. मात्र दु:खानंतर नवे सुख येण्याऐवजी नवे दु:खच येते. दु:खापासून दूर होण्यासाठी साधना आवश्यक आहे. आपण केवळ सुख मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मात्र शांती आणि समाधीसाठी काही करीत नाहीत. जीवनाचे लक्ष्य काय आहे? सुख, शांती की समाधी? पर्यायीपणे सुख शरीराशी, शांती मनाशी तर आत्मा समाधीशी जुडलेला आहे. आपण स्वत: या स्तरांमध्ये गेलो तर आपण कुठे आहोत, याची जाणीव होईल. आत्म्याशी जुडले गेलो तर परम सुखाची अनुभूती मिळेल. त्यासाठीच प्रयत्न होणेही आवश्यक आहे.
पैसा, घर हे सुखाची साधने आहेत, सुख नाहीत. सुखाची साधने गोळा करण्यातच जीवन व्यतित होईल. सध्या त्यासाठीच आंधळी स्पर्धा सुरू आहे. हरीणाला दिसणाºया मृगजळाप्रमाणेच हे सगळे आभासी असल्याचेही जैनाचार्य म्हणाले. मनुष्य जीवनाचा उद्देश आम्ही ओळखत नाहीत. केवळ नशिबाने मिळालेले हे जीवन सुख भोगण्यासाठीच नाही. जीवनाचा उद्देश फक्त मोक्ष आहे. बंधनांपासून मुक्त होत ते शिखर गाठणेच आपले लक्ष्य असले पाहिजे. साधनेचा पुरुषार्थ करूनच मोक्ष मिळू शकतो. मात्र आपण सुखाच्या लालसेत शांती व समाधीचे लक्ष्यच विसरून गेलो, असेही ते म्हणाले.