अट्टल दरोडेखोराकडून ६ जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त, तीन जिल्ह्यात गुन्ह्यांचे आहे रेकॉर्ड
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 4, 2023 06:13 PM2023-09-04T18:13:43+5:302023-09-04T18:14:20+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सलग दुसरी कारवाई
हिंगोली : नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दरोडेखोराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ६ जिंवंत काडतूसांसह एक पिस्तूल जप्त केले. ही कारवाई वसमत तालुक्यातील हयातनगर येथे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
वसमत तालुक्यातील हयातनगर येथील चांदू सुग्रीव जाधव (वय ३५) याने दोन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश येथून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने हयातनगर गाठून चांदू जाधव याचे घरावर छापा टाकला. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक पिस्तूल व ६ जिवंत काडतूस आढळून आले. त्यास याबाबत विचारणा केली असता त्याने मध्यप्रदेश येथून ५५ हजारांना पिस्तूल व काडतूस खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पथकाने वेळीच पिस्तूल जप्त केल्याने भविष्यात होणारी जीवित घटना टळण्यास मदत झाली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, गणेश लेकूळे यांच्या पथकाने केली.
तीन जिल्ह्यात गुन्हे दाखल
दरम्यान, पिस्तूल व जीवंत काडतूस पकडल्यानंतर पोलिसांनी चांदू जाधव याची माहिती काढली असता त्याचेवर पूर्णा (जि. परभणी) येथे दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच भाग्यनगर (जि.नांदेड) येथे घरफोडीचे ५ गुन्हे दाखल असून हिंगोली जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.