प्लास्टिक बंदीचा जिल्ह्यात फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:03 AM2018-12-17T00:03:29+5:302018-12-17T00:03:57+5:30
शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
राज्यभरात प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करून अनेकांना दंड ठोठावण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना कॅरबॅगचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. दुकानावरही कॅरीबॅग उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना सांगितले जात होते. परंतु मध्येच ही मोहीम थंडावल्याने हिंगोली शहरासह जिल्हाभरात प्लास्टिक व कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील प्लास्टिकसाठा जप्त केला होता. ही धडक मोहीम अनेक महिने सुरू होती. हजारोंचा दंड भरावा लागत असल्याने अनेकांनी दुकानात कॅरीबॅग न ठेवलेलीच बरी असे चित्र निर्माण झाले होते. हिंगोली शहरात नगर परिषद व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक, थार्माकॉल, अविघनशिल वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री, वाहतूक करणाºयांविरूद्ध २५ आॅक्टोबर रोजी मोहीम राबवून अनेक दुकानांची तपासणी केली. चाळीस हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला होता. परंतु आता हिंगोली शहरातही ही प्लास्टिक वापरावर बंदी ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. काही तुरळक दुकानावर मात्र कॅरीबॅग ऐवजी कागदी पिशव्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिकचे तुकडे इतरत्र जमीनमध्ये तसेच नदी व नाल्यात मिसळतात. प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या पोटात गेल्याने अनेक मुक्या जनावरांचे प्राण जातात.त्यामुळे प्लास्टिक वापर टाळणे काळाची गरज आहे.
राज्यातील महानगरपालिकाव नगरपालिका यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून २०१६ ते २०१७ मध्ये राज्यातून एकूण २३,४४९.६६ मे. टन प्रतिदिन घनकचरा झाला असून त्यात प्लास्टिक कचºयाचे ५ ते ६ टक्के अंश गृहित धरल्यास सरासरी १२०० मे टन प्रतिदिन एवढा प्लास्टिकचा कचरा राज्यातून निर्माण होतो.
प्लास्टिक वापर याबाबत हवी तशी जिल्ह्यात जनजागृती होत नाही. शिवाय इतर संबधित विभागही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे पालिकेचे पथक अधून-मधून कारवाई करताना दिसते.