पंतप्रधानांचा थेट व्हिडिओ संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:52 PM2019-01-23T23:52:55+5:302019-01-23T23:54:05+5:30
येथील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
महावीर भवनात लोकसभा मतदार संघातून आलेल्या बुथप्रमुखांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यासाठी तांत्रिक व्यवस्था केली होती. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जगदेवराव घुमारे यांनी मोदी यांना लोकांचे जीवन सुसह्य होईल, अशा कोणत्या योजना राबविल्या, असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आम्ही पीपल फ्रेंडली व्यवस्थेकडे लक्ष देवून लोकांचे जीवन सुकर होईल, अशा अनेक योजना आणल्याचे सांगितले. त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, कागदपत्रे स्वत:च अटेस्टेड करण्याी सोय, हयात प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन सुविधा, स्कॉलरशिप, गॅस, वीज जोडणीही आॅनलाईन केली. याशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत मिळतील, अशी सोय केली. मोबाईलवर उमंग अॅप आणल्यास तीनशेवर सेवा मिळतील. तर पासपोर्ट कार्यालये ७७ वरून साडेतीनशेपेक्षा जास्त केली, असेही मोदी यांनी सांगितले.