भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू
By विजय पाटील | Published: February 21, 2024 12:42 PM2024-02-21T12:42:41+5:302024-02-21T12:43:12+5:30
कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील घटना
हिंगोली : अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे २० फेब्रुवारी रोजी घडली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणे सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रेणापूर येथील मारोती मंदिरात मागील चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी जया एकादशीनिमित्त उपवास असणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी ६ वाजता जवळपास ४० किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता. हा प्रसाद गावातील ५०० लोकांनी खाल्ला. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास काहींना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ३५ जणांना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. तर दुसऱ्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जवळपास आणखी ३० जणांना लक्षणे जाणवत असल्यामुळे जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाऊराव पतंगे, पांडूरंग पतंगे, अनिल पतंगे, सोनाजी पतंगे, शेषराव वानखेडे, कासूबाई श्रृंगारे, श्याम श्रृंगारे, बाबाराव कुटे, शिवाजी पतंगे यांच्यासह जवळपास दिडशे जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. जिल्हा रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दीपक मोरे, डाॅ.प्रसाद मस्के, डाॅ.नंदकिशोर करवा, डाॅ. देशमुख, डाॅ.दीपक मोरे, डाॅ.विशाल पवार, आशा क्षिरसागर, राठोडे आदींनी उपचार केले.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने गावात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले असून, आरोग्य विभाग रेणापूरवर लक्ष ठेवून आहे.