औंढ्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 01:28 PM2021-04-27T13:28:29+5:302021-04-27T13:29:37+5:30
Crime News in Hingoli पोलिसांनी वाळकी फाटा येथे केली कारवाई.
औंढा नागनाथ: अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी मंगळवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान वाळकी फाट्यावर कारवाई केली. यावेळी वाहन आणि देशी दारूचे १५ बॉक्स असा ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली आहे.
कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात ब्रेक-दि -चेन अंतर्गत शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. यानुसार देशी-विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अवैध वाहतूक करून खेडोपाडी दारू पोहचत आहे. या माहितीवरून मंगळवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या पथकाने हिंगोली औंढा राज्य रस्त्यावरील वाळकी फाटा येथे सापळा लावला. यावेळी पहाटे २ वाजेच्या दरम्यान एका वाहनास पोलिसांनी अडवून तपासणी केली. त्यात देशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी वाहनासह देशी दारूचे १५ बॉक्स असा ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजू संभाजी गीते ( २५ ), राजरत्न मनोहर पाईकराव ( २५ ), बबन दराडे ( २५ ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार अफसर पठाण, बंडू घुगे, इक्बाल शेख, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, बांगर,वसीम पठाण आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.