बेवारस सापडलेल्या बाळाला पोलीस दलाची मायेची ऊब, तान्हुल्या बाळाला पाजला पान्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:48+5:302021-01-18T04:29:39+5:30
१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
हिंगोली: खाकी वर्दीतही माणुसकीचा ओलावा असतो याचे प्रत्यंतर येथे आले. बसस्थानकात सापडलेल्या तीन महिन्यांच्या बेवारस बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, तरीही या बालकाचे रडणे थांबत नव्हते. हे पाहून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले दूध या बाळाला पाजले आणि त्याचे रडणे थांबविले. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांना परिस्थितीनुसार कठोर बनावे लागते. त्यासोबत कधी मायेची ऊबही द्यावी लागते, हे शेख या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाळाला आपले दूध पाजून दाखवून दिले. यामुळे कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, हे सिद्ध केले आहे. या बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन हिंगोली पोलिसांनी केले आहे.
माझा जीव कासावीस होऊ लागला...
तीन महिन्यांच्या बाळाला जिल्हा सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस ते बाळ रडण्याचे थांबत नव्हते. त्या बाळाला भूक लागली असावी हे केवळ माताच जाणते. मला राहवले नाही. मी क्षणाचाही विचार न करता त्या बाळाला माझे दूध पाजले आणि त्याचे रडणे थांबले. त्यानंतर माझे मन शांत झाले.
-सलमा शेख, महिला पोलीस, हिंगोली शहर पोलीस ठाणे.