वाहन सोडण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 07:15 PM2018-05-16T19:15:41+5:302018-05-16T19:15:41+5:30

अपघाताच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत केल्याने व गुन्ह्यात जप्त केलेले ट्रॅक्टर, ट्रॉली सोडण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वर्ग-२ शुध्दोधन गोविंदराव जोंधळे यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

A police officer who receives a bribe of 10 thousand rupees for the vehicle to leave ACB | वाहन सोडण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वाहन सोडण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Next

हिंगोली : अपघाताच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत केल्याने व गुन्ह्यात जप्त केलेले ट्रॅक्टर, ट्रॉली सोडण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वर्ग-२ शुध्दोधन गोविंदराव जोंधळे यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. १६ मे रोजी हट्टा ठाण्याच्या आवारातच ही कारवाई केली.

सविस्तर माहिती अशी की, औंढा तालुक्यातील वगरवाडी तांडा येथील सुनील पवार याच्याविरूद्ध अपघात प्रकरणी गुन्हा दाखल होता. अपघाताच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली सोडविण्यासाठी वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यातील पोउपनि शुध्दोधन गोविंदराव जोंधळे यांनी १५ हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत पवार यांनी १५ मे रोजी पोलीस अधिकारी पैसे मागत असल्याची रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.

एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई करून पडताळणी केली. यावेळी पोउपनि जोंधळे यांनी तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दिली. १६ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  हट्टा ठाण्याच्या परिसरात कारवाई करून शुध्दोधन जोंधळे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर, पोनि नितीन देशमुख, पोहेकॉ शेख उमर, सुभाष आढाव, अभिमन्यु कांदे, पोना संतोष दुमाने, शेख जमीर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, महारूद्रा कबाडे, प्रमोद थोरात, पोशि अविनाश कीर्तनकार, आगलावे आदींनी केली.

‘त्या’ अपघाताने अखेर पोलिसांना घेरलेच

वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील कळंबा पाटीवर ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एकजण ठार झाला होता. यातील मयत सराफाजवळ २० तोळे सोने होते व ते पोलिसांनी लांबवल्याची तक्रार मयताच्या पत्नीने दिली होती. या अपघाताचे प्रकरण प्रचंड गाजले होते. उपोषण, निवेदने, तक्रारी व पोलिसांनी मुद्देमाल जप्त न दाखविता काटा कापून केलेली वाटणी आदी प्रकाराने हट्टा पोलिसांवर प्रचंड बालंट आले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंत या अपघाताचे प्रकरण गेलेले आहे. त्याच अपघातातील ट्रॅक्टर मालकाकडूनही लाच मागण्याची हिंमत हट्टा पोलिसांनी केली. अखेर या प्रकरणाने एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी घेतलाच. अजूनही २० तोळे सोने गहाळ प्रकरण धुमसत आहे.

Web Title: A police officer who receives a bribe of 10 thousand rupees for the vehicle to leave ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.