सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 24, 2024 03:25 PM2024-01-24T15:25:07+5:302024-01-24T15:25:45+5:30
वसमत तालुक्यातील सारोळा येथील एकाकडे गावठी लोखंडी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
हिंगोली : वसमत तालुक्यातील सारोळा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एकास गावठी पिस्तूलसह ताब्यात घेतले. त्याचेविरूद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील सारोळा येथील एकाकडे गावठी लोखंडी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सारोळा गाव गाठले. तेथे दिपक राजेश दुधाटे ( वय २१ रा. सारोळा ता. वसमत) याचेघरी छापा टाकला. त्यास ताब्यात घेत गावठी पिस्तूलबाबत विचारणा केली असता त्याने जवळ गावठी पिस्तूल असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचेकडून बॅरल, ट्रिगरयुक्त गावठी पिस्तूल ताब्यात घेतले.
या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिपक दुधाटे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.