हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 8, 2024 04:09 PM2024-05-08T16:09:20+5:302024-05-08T16:09:44+5:30
कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत.
हिंगोली : हिंगोली शहरातील पेन्शनपूरा भागातून पोलिसांनी तब्बल ४२ जनावरे संशयावरून पकडली. सर्व जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात बांधली आहेत. ही कारवाई ७ मे रोजी रात्री करण्यात आली. दरम्यान, जनावरांचा दाखला दाखवून जनावरे घेऊन जाण्याचे आवाहन करूनही बुधवारी दुपारपर्यंत कोणी दाखला आणला नव्हता. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहेत.
शहरातील पेन्शनपूरा भागात काही घराजवळ जनावरे बांधलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसांनी जनावरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बोधगिरे, उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार संभाजी लकुळे, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, संजय मार्के यासह स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी, अंमलदारांचा ताफा मंगळवारी रात्री पेन्शनपुरा भागात दाखल झाला.
यावेळी पाहणी केली असता तब्बल ४२ जनावरे आढळून आली. काही जणांकडे जनावरांबाबत चौकशी केली असता समाधाकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सर्व ४२ जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणली. यावेळी काही जणांनी ही जनावरे आपल्या मालकीची असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जनावरांचे दाखले दाखविण्याच्या सूचना केल्या. मात्र ८ मे रोजी दुपारपर्यंत कोणीही जनावरांचे दाखले दाखल करू शकले नाहीत.
पोलिस ठाण्यातच चाऱ्या,पाण्याची सोय
दरम्यान, पोलिस ठाण्यात जनावरे आणून बांधली आहेत. दाखला दाखविल्यानंतरच मूळ मालकाला जनावरे सुपूर्द केली जाणार आहेत. बुधवारी दुपारपर्यंत कोणीही दाखला दाखल केला नसल्यने पोलिस ठाण्याच्या आवारातच जनावरे बांधली आहेत. येथेच हिरवा चारा, पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पोलिस अधिकारी, अंमलदारांनी सकाळी हिरवा चारा जनावरांना टाकला होता.
...तर गोशाळेत जनावरे होणार दाखल
कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आली असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी काही जणांची चौकशीही सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र चौकशीनंतरच जनावरे कोणी आणली, कोणाची आहेत हे स्पष्ट होणार आहे.