पोलिसांची दडपशाही चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:05 AM2018-07-27T00:05:29+5:302018-07-27T00:05:38+5:30
जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. उद्या यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असा इशारा शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून दिला. आ.रामराव वडकुते यांनी आक्रमक भूमिका मांडली.
मराठा आरक्षणातील आंदोलकांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. एक-दोन प्रकार वगळता इतरत्र नाहक गुन्हे दाखल केले. शिवाय आरोपींची संख्या मनमानी पद्धतीने वाढविल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. आंदोलन दडपण्यासाठी जर हे करणार असेल तर यामुळे उद्रेकच होईल. उद्या यामुळे नवे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा ही नावे आता वगळा, अशी मागणी करण्यात आली. तर काही अधिकारी वैयक्तिक प्रकरण असल्यासारखे वागत आहेत. अशांना समज देण्याची मागणी केली. तर आंदोलनाचे संयोजक म्हणूनही काही जणांची नावे नाहक टाकली. तीही वगळण्याची मागणी केली. तर आंदोलन दडपण्यासाठी शासनानेच आदेश तर दिला नाही? असा सवालही केला. तर नावे नसलेल्यांच्या घरी जावूनही नाहक चौकशा केल्या जात आहेत, हे चुकीचे प्रकार थांबविण्याची मागणी केली. यावेळी आ.वडकुते हे आक्रमक झाले होते.
आखाडा बाळापूर येथील सपोनि चिंचोलकर यांच्या अशिष्ट वागण्याबाबतही अनेकांनी तक्रारी मांडल्या. या शिष्टमंडळात आ.रामराव वडकुते, आ.संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राकाँ जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अॅड. बाबा नाईक, माधव कोरडे, बी.डी. बांगर, धनु पाटील, राजेगोरे, कैलास साळुंके, रवींद्र गडदे, राम कदम, बालाजी घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासूनच योग्य ती कारवाई करू. यात कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, हे स्पष्ट केले. यावेळी स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांचीही उपस्थिती होती.