पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; ८ लाखांची रोकड सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:25 PM2021-06-17T14:25:26+5:302021-06-17T14:42:37+5:30
एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट बाजूला ढकलून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूनी आतमध्ये प्रवेश केला.
डोंगरकडा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न १७ जूनच्या मध्यरात्रीला झाला आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. यामुळे एटीएम मशीनमधील ८ लाखांची रोकड बचावली आहे.
नांदेड - हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा फाटा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. महामार्गावर एटीएम असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व डोंगरकडा परिसरातील नागरिकांची नेहमीच येथे पैसे काढण्यासाठी गर्दी करतात. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी १७ जून रोजीच्या मध्यरात्री अंदाजे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या एटीएमच्या पाठीमागील असलेल्या स्टोअर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्टोअर रूम व इतर ठिकाणी असलेले सीसीटिव्ही कॅमेरे फोडून टाकले, त्यानंतर एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट बाजूला ढकलून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूनी आतमध्ये प्रवेश केला.
चाेरट्यांनी एटीएम मशीनचा पत्रा कापण्याचा प्रयत्न केला, पण एटीएम मशीन ऑनलाईन असल्याने हैद्राबाद येथून आखाडा बाळापूर पोलीसांना सर्तकतेचा संदेश पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास मिळाला. यानंतर लगेच सपोनि रविकांत हुंडेकर, पोउपनि हनुमंत नकाते, पोउपनि अच्युत मुपडे, जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकतात, चोरटे तेथून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसराची पहाणी केली. त्यानंतर हिंगोली वरून श्वानपथक, फिंगर प्रिंट तज्ञ यांना बोलवून घेण्यात आले. पण यावेळी श्वानपथकला चोरट्यांचा मार्ग सापडला नसल्याने ते परत निघून गेले. नांदेड येथुन एटीएमचे इंजिनिअर संजय आडे, यांनी मशीनची तपासणी केली. एटीएममधून एक रूपयाही चोरीला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.