आरक्षणाच्या पोस्टची रंगली राजकीय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:18 AM2018-09-05T00:18:42+5:302018-09-05T00:18:58+5:30
आॅगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. यादरम्यान काही पोस्टमध्ये आमदार, खासदारांना जाब विचारा अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली अन् त्यावरून भाजपचेच रामरतन शिंदे यांना पोलिसांनी चौकशीस पाचारण केल्याने हे प्रकरण चवीने चर्चिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आॅगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. यादरम्यान काही पोस्टमध्ये आमदार, खासदारांना जाब विचारा अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली अन् त्यावरून भाजपचेच रामरतन शिंदे यांना पोलिसांनी चौकशीस पाचारण केल्याने हे प्रकरण चवीने चर्चिले जात आहे.
याबाबत आ. मुटकुळे यांनी पोलिसांकडे एका पोस्टाचा दाखला देऊन यामुळे जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाच्या आडून समाजमाध्यमांवर विष पेरण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींबद्दल एकेरी शब्दात उल्लेख करून आमदार, खासदारांच्या घरात घुसून त्याला जाब विचारा आदी डोके भडकविणाऱ्या बाबी टाकल्याने कारवाईची मागणी केली. याबाबत भाजपचे नेते रामरतन शिंदे यांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे या प्रकारावरून उलटसुलट चर्चा रंगत आहेत. अनेकजण त्याला आगामी विधानसभेचा रंग देताना दिसत आहेत.
याबाबत रामरतन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आ.मुटकुळे हे आमचे नेते व पितृतुल्य आहेत. आलेला मेसेज फॉरवर्ड केला. शिवाय त्या संदेशात समाजाची खदखद व्यक्त करून शेवटी दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशीला बोलावल्याची कबुली दिली.
याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे म्हणाले, अशा माथेफिरु पोस्टमुळे उद्या काही होईल म्हणून आम्ही जिवाची भीती बाळगली तर चुकीचे काय? त्यामुळेच या प्रकाराची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना दिले. ते त्यांचे काम करीत आहेत. कोणा व्यक्तीविरुद्ध तक्रार नाही.