' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर
By विजय पाटील | Published: September 12, 2023 01:46 PM2023-09-12T13:46:39+5:302023-09-12T13:51:00+5:30
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले
हिंगोली: सेनगाव ते हिंगोली राज्य महामार्गावरील खुडज पाटीवर खुडज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राजकीय नेत्यांना, गावबंदी केली जाणार आहे, असे बॅनर लावण्यात आले आहे.
मागच्या पंधरा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला खुडज व परिसरातील मराठा समाजबांधवांनी समर्थन दिले आहे. या संदर्भात काही ग्रामस्थांनी खुडज फाट्यावर राजकारणी मंडळींना खुडज गावात बंदी आहे, असे फलक लावले आहे. यावेळी आंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान झालेल्या लाठीमार घटनेचा गावकऱ्यांनी निषेध केला आहे. तसेच त्या घटनेच्या निषेधार्थ ६ सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले आहे.