निर्बंध न पाळणाऱ्या बेबंदांमुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:57+5:302021-04-19T04:26:57+5:30

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली ...

Positivity rate at 17% due to non-compliance | निर्बंध न पाळणाऱ्या बेबंदांमुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर

निर्बंध न पाळणाऱ्या बेबंदांमुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर

Next

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली जात असून, बाजारपेठेत धुडगूस घातला जात आहे. अनेक दुकानेही निर्बंध असतानाही मागच्या दरवाजाने अथवा अर्धे शटर करून सुरू ठेवण्याचे धाडस केले जात आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेत नाही. मागील तीन महिन्यांचाच विचार केला तर टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता १५ टक्क्यांच्याही पुढे सरकलेला आहे. त्यात कमी - अधिक चाचण्या होत असल्या तरीही या दरात फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब घातक असून, शंभरात पंधरा बाधित निघत असतील व त्यांनी जराही काळजी न घेतल्यास हा दर असाच वाढत गेला तर बाहेर पडणेही मुश्कील होणार आहे. आधीच यंत्रणा अपुरी पडत असून, नव्याने यंत्रणा उभारण्यासह आहे ती यंत्रणा कार्यान्वित ठेवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, कोरोना प्रतिबंधक लस या सर्वच बाबींचाही तुटवडा आहे.

फेब्रुवारीत पाच टक्के होता दर

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर होता. या महिन्यात आरटीपीसीआरच्या ५८४८ चाचण्या, तर अँटिजेनच्या १४१५ चाचण्या केल्या होत्या. एकूण ७२६३ पैकी ३६९ बाधित आढळले होते. पॉझिटिव्हिटी दर ५.०८ टक्के होता, तर ४ मृत्यू झाल्याने मृत्यूदर १.०८ होता.

मार्चमध्ये ८.२२ टक्क्यांवर

मार्च महिन्यात आरटीपीसीआरच्या १२७१५, तर अँटिजेन १५०९२ चाचण्या झाल्या. एकूण २९८०७ पैकी २४५२ बाधित आढळले. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर ८.२२ टक्के होता, तर या काळात ३० जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युदर १.२२ टक्क्यांवर होता.

एप्रिलमध्ये चित्रच पालटले

एप्रिल महिन्यात कोरोनाचे चित्र एकदमच पालटले. १० एप्रिलपर्यंत आरटीपीसीआरच्या अवघ्या ४९७३, तर अँटिजेनच्या ५४४२ अशा १०४१५ चाचण्या झाल्या. यापैकी तब्बल १७२७ जण बाधित आढळले. पॉझिटिव्हिटी दर १६.५८ टक्के आहे, तर मृत्यू २४ झाले. मृत्युदर १.३९ टक्के आहे. मागील आठ दिवसांतही १५२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट अजूनही त्याच तुलनेत कायम असून, १५ टक्क्यांच्या पुढेच आहे, तर मृत्युदर वाढत चालला आहे.

तब्बल ५४ मृत्यू

चालू महिन्यात तब्बल ५४ मृत्यू झाले आहेत. कोरोनाची साथ आल्यापासून मार्चपर्यंत ९० मृत्यू झाले होते. त्याच्या ६० टक्के मृत्यू फक्त मागील अठरा दिवसांत झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला शासनाचे नियम तोडण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरुणाईला तेवढा फटका बसत नसल्याचे सांगितले जात असले तरीही मागील पंधरा दिवसांत सात ते आठ तरुणांचाही मृत्यू झाला, हे लक्षात घेतले पाहिजे.

Web Title: Positivity rate at 17% due to non-compliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.