घरपोच सेवा देणारी पोस्टाची ‘मोबाईल बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:53+5:302021-04-30T04:37:53+5:30
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला असला तरी डाक विभागाच्या योजनांना अजूनतरी कोरोनाची दृष्ट लागली नाही. कोरोना काळातही ...
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला असला तरी डाक विभागाच्या योजनांना अजूनतरी कोरोनाची दृष्ट लागली नाही. कोरोना काळातही डाक विभागाच्या मोबाईल बँकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
१ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने पेमेंट बँक सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला बचत, चालू खाते उघडता येते. ही बँक म्हणजे आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) होय. ही बँक पूर्णत: मोबाईलवर आधारित असून घरपोच सेवा देणारी आहे. खातेदाराला ग्रामीण किंवा शहरी कोठूनही पैशाची देवाण घेवाण करता येते. खातेदारांची गैरसोय होऊ नये म्हणून डाक विभागाच्या ब्रँच पोस्ट मास्टर, सहायक ब्रँच पोस्ट मास्टर यांना मोबाईल पुरविण्यात आले आहेत. डाक विभागाच्या सर्व योजनांची माहिती खातेदार व इतरांना द्यावी, असेही सूचित केले आहे.
पोस्टाने सर्वच क्षेत्रात भरारी घेतल्याचे पहावयास मिळत आहे. बचत खाते, टाईम डिपाॅझिट, आरडी, सिनिअर सिटीझन, नॅशनल सेव्हींग, सुकन्या योजनेबरोबर डाक विमा योजनेला प्रतिसाद मिळत आहे. डाक विमा योजना १ फेब्रुवारी १८८४ रोजी सुरू झाली आहे. या योजनेत ५० लाखांपर्यंत विमा काढता येतो. १ लाखाला वार्षिक ५ हजार २०० बोनसही पोस्टातर्फे दिला जातो.
केंद्र सरकारने ग्रामीण डाक विमा योजना २४ मार्च १९९५ रोजी सुरू केली आहे. यामध्ये १० लाखांपर्यंत विमा काढता येतो. १ लाखाला वार्षिक बोनस ४ हजार ८०० दिला जातो. शेतकरी, शेतमजूर तसेच कोणत्याही नागरिकाला लाभदायकच अशी योजना आहे.
-प्रकाश जी. वाघमारे, पोस्ट मास्टर, मुख्य डाकघर, हिंगोली