पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:47 AM2023-04-26T11:47:30+5:302023-04-26T11:48:18+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे.
कळमनुरी : पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले आहे. सालाने राहूनही मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, या चिंतेतून कोंढूर येथील एका मजुराने आपली जीवनयात्रा संपविली.
कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील मजुराच्या हाताला काम मिळत नसल्याने त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील कोंढूर येथे २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. गळफास घेतलेल्या मजुराचे नाव विठ्ठल गुलाबराव पतंगे (४०) असे आहे. गत काही महिन्यांपासून रोजंदारीचे काम मिळत नाही. काम मिळाले तर रोजंदारीच्या पैशातून घराचा उदरनिर्वाह होत नाही. त्यातून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत हा ताण मयत विठ्ठल पतंगे यांनी मनावर घेतला. मयताचा मुलगा धोंडिबा पतंगे याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली तर मुलगी श्रावणी ही आठवीला शिक्षण घेत आहे. विठ्ठल पतंगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर येऊन ठेपली आहे.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य मुलांच्या शिक्षणाला आड येत होते. थोडीबहुत शेती असती तर संसाराला हातभार लागला असता. परंतु त्यांना शेती नव्हती.
लोकांचे उसने-पासणे तरी किती दिवस करायचे ही चिंताही नेहमीच त्यांना सतावत असे. आपण दारिद्र्यात जीवन काढले आहे. मुलाला व मुलीला खूप शिक्षण देऊन दारिद्र्यातून बाहेर काढायचे, असे त्यांना वाटायचे. आजमितीस आपण ४० वर्षांचे झालो आहोत. यापुढे मुला-मुलींना शिक्षण द्यायला पैसे मिळतील की नाही? हे काही सांगता येत नाही. या चिंतेतून या मजुराने आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख अन्सार हे करीत आहेत.