वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:45 AM2018-09-18T00:45:12+5:302018-09-18T00:45:26+5:30
महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात विविध भागात अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. डीपीवरून वीजचोरी होत असल्याने भाव वाढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा डीपीवर नियमित जोडणी घेवून देयके भरणाऱ्या शेतकरी व घरगुती ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील वीजचोरीला आळा घालण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता एस.बी. जाधव यांनी केले. तर संबंधित ऐकतच नसल्यास याची माहिती महावितरणलाही द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात फिडरनिहाय थकबाकी व वीजचोरीच्या प्रकाराची माहिती गोळा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीजचोरीविरुद्ध यापूर्वीही मोहीम राबविण्यात आली होती. यंदा पुन्हा अशी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारांना अटकाव करणे गरजेचे आहे. शिवाय महावितरणच्या अधिकाºयांनाही कृषी व घरगुती अनधिकृत वीजजोडण्या असल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील, असेही जाधव म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातील थकबाकीचा आकडाही वाढत चालला आहे. घरगुती असो वा कृषीपंप. ही थकबाकी भरल्याशिवाय यापुढे रोहीत्र देणे शक्य नाही. महावितरणच्या वरिष्ठांचेच तसे आदेश आहेत. त्यामुळे शेतकºयांना वेठीस धरण्यासाठी नव्हे, तर महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी हे अपरिहार्य आहे. शेतकºयांनी अधिकृतरीत्या देयके भरल्यास अशांची अडवणूक करण्याचे कोणतेच कारण नाही. देयक भरल्यानंतर संबंधित शेतकºयांना रोहीत्र वेळेत बदलून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
कृषीपंपधारक शेतकरी पूर्ण देयक वेळेवर भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. वर्षाचे देयक मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यातही प्रति हॉर्सपॉवर हजार रुपये याप्रमाणे देयकाची रक्कम भरल्यास नादुरुस्त डीपी दुरुस्त करून दिला जाईल. ही रक्कम पूर्ण देयकाच्या तीस टक्क्यांच्या आसपासच होते.
त्यामुळे एक एचपीच्या पंपास हजार रुपये, तीन एचपीसाठी तीन हजार रुपये, पाच एचपीसाठी पाच हजार रुपये भरावे लागतील. त्या रोहित्रावरील प्रत्येक शेतकºयाने एवढी रक्कम भरल्यास रोहित्र वितरित करण्यात येणार असल्याचेही जाधव म्हणाले.
गावठाण रोहित्रावर मात्र किमान ७५ टक्के थकबाकी वसूल झाल्याशिवाय रोहीत्र वितरित केले जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहनही त्यांनी केले.