पुसेगाव येथील विद्युत खांब वाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:22+5:302021-01-13T05:18:22+5:30

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील नवीन वसाहत ते पुसेगाव या एक किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी ...

The power pole at Pusegaon bent | पुसेगाव येथील विद्युत खांब वाकले

पुसेगाव येथील विद्युत खांब वाकले

googlenewsNext

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील नवीन वसाहत ते पुसेगाव या एक किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. ग्रामपंचायतने याची दखल घ्यावी, अशी मागणी राहुल खिल्लारे, पुंजाजी धाबे, संजय अंभोरे, शेषराव धाबे, अर्जुन पटांगळे, सिद्धार्थ बनसोडे यांनी केली आहे.

शिरडशहापूर येथे कचऱ्याचे ढीग साचले

शिरडशहापूर: येथील ग्रामपंचायतचे सफाई कामगार मागील काही दिवसांपासून संपावर गेेले आहेत. त्यामुळे गावात ठिकठिकाणी कचरा साचला जात आहे. कचऱ्यामुळे दुर्गधी पसरली आहे. परिणामी विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शिरडशहापूर येथे स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वळण रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील वळण रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे वाहनचालकांना कठीण होऊन बसत आहे. खड्ड्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घेऊन वळण रस्त्यांवरील खड्डे डांबरमिश्रीत गिट्टीने बुजवावेत,अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

बळसोंड येथे सहा तास वीज खंडित

बळसोंड: हिंगोली शहरापासून जवळ असलेल्या बळसोंड येथे १० जानेवारी रोजी सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बळसोंड येथे हिंगोली येथून वीजपुरवठा होतो. वीज खंडित होण्याचे प्रमाण वारंवार वाढत आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन बळसोंड येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

आखाडा बाळापूर येथे स्वच्छता मोहीम राबवा

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील हनुमान गल्ली, जेतवननगर येथील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आल्या नाहीत. नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यांवर येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतने याची दखल घेऊन आखाडा बाळापूर येथे स्वच्छता मोहीम राबवावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

कळमनुरी: येथील बसस्थानकामध्ये मागील काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या, पाणीपाऊच, काचेच्या बॉटल आदींचा खच पडलेला पहायला मिळत आहे. बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवा, अशी मागणी अनेक वेळा प्रवाशांनी केली आहे. परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. बसस्थानकातील घाणीमुळे प्रवाशांना त्रास होत आहे. आगारप्रमुखांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्ता तसेच इतर वर्दळीच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. जड वाहने रस्त्याच्या मधोमध थांबविली जात आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबविणे गरजेचे आहे.

फळगाडे रस्त्यावर ; रहदारीस अडथळा

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर फळगाडे मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. बाजाराच्या दिवशी तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेने फळगाडे चालकांना पर्यायी जागा देवून रहदारीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The power pole at Pusegaon bent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.