बिकट वाट ! रस्ता नसल्याने गर्भवती मातेस चक्क खाटावरून नेले रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:46 PM2019-07-30T18:46:20+5:302019-07-30T18:48:15+5:30
गर्भवतीस खाटेवर बसवून 3 ते 4 किमी चिखल तुडवत गावाबाहेर आणले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील करवाडी गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. अन गावात वाहनांची सुविधाही नाही. मागील वर्षानुवर्षपासून येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. आंदोलने केली पण शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज परत एकदा एका गर्भवती मातेची हेळसांड झाल्याची घटना घडली आहे. सदर महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी चक्क खाटावर उचलून नेण्यात आले. त्यामुळे जवळपास 3 किमी चिखल तुडवत प्रवास करावा लागला.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी हे गाव आदिवासीबहुल आहे. गावची लोकसंख्या आसपास अडीचशे आहे. या ठिकाणी कुठल्याच आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. बाळंतपणासाठी करवाडी गावी माहेरी आलेल्या सुवर्णा रमेश ढाकरे ( 25) या गर्भवती मातेस आज सकाळपासूनच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी तयारी सुरू केली. परंतु, रस्ताच नसल्यामुळे गावात वाहने येत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी व गावातील लोकांनी सदर गरोदर मातेस रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क खाटेवर बसवून 3 ते 4 किमी चिखल तुडवित गावाबाहेर आणले. त्यानंतर काही वेळाने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका पोहोचली. त्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे मातेला पोतरा येथील आरोग्य केंद्रात दाखल केल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर गरोदर मातेवर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकातून सांगितले जात होते.
यापूर्वीही घटली होती घटना
रस्ताच नसलेल्या करवाडी गावात वाहन नसल्याने अडीच वर्षाच्या मुलीला दोन वर्षांपूर्वी झटके येऊ लागल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तब्बल सहा किलोमीटर चिखल तुडवत रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे जिल्हाभरातून संतापाची लाट उसळली होती. आदिवासी पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी कळवाडी गावाला रस्ता करावा या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने केली 40 किमी पायी चालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. करवाडी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा उच्च न्यायालयाने ही दखल घेतली होती परंतु ढिसाळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी येथील रस्ता करायच्या मागणीकडे लक्ष दिले नाही आणि दखलही घेतली नाही. विशेष म्हणजे गावातील लोकांनी रस्ता मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता परंतु रस्ता काही झाला नाही त्यामुळे आज परत एक घटना घडली असून आता तरी प्रशासन जागे होईल का उपस्थित केला जात आहे.