खड्ड्यांमुळे गर्भवती रस्त्यातच झाली प्रसूत; बाळ आणि माता सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:25 PM2018-09-29T17:25:21+5:302018-09-29T17:30:12+5:30
रस्त्यातील खड्ड्यांमुळे तिच्या प्रसव कळा जास्तच वाढल्या. यामुळे दवाखान्यात पोहचण्याआधीच ति गाडीतच प्रसूत झाली.
आखाडा बाळापुर (हिंगोली ) : आज सकाळी गावातील एका महिलेस प्रसूतीच्या कळा आल्याने तिच्या वडिलाने दवाखान्यात जाण्यासाठी चारचाकी गाडी बोलावली. गाडीत ते बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे निघाले. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे तिच्या प्रसव कळा जास्तच वाढल्या. यामुळे दवाखान्यात पोहचण्याआधीच ति गाडीतच प्रसूत झाली. त्याच अवस्थेत माता आणि बाळास दवाखान्यात नेऊन दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चांगली आहे.
कळमनुरी तालुक्यातील देवजना येथील सावित्रा संजय कल्याणकर या गर्भवती महिलेस आज सकाळी प्रसव कळा सुरु झाल्या. यामुळे तिला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यासाठी तिचे वडील बबन खंडोजी चव्हाण यांनी चारचाकी क्रुझर गाडी बोलावली. सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास ते दवाखान्याच्या दिशेने निघाले. मात्र, देवजना फाटा ते शेवाळा यादरम्यान रस्ता खराब असल्याने सावित्री यांना त्रास होऊ लागला. खड्ड्यांमुळे तिच्या प्रसव कळा जास्तच वाढल्या व याच रस्त्यावर ती सकाळी दहा वाजून पाच मिनिटाला गाडीतच बाळंत झाली.
याच अवस्थेत बाळ आणि आईला ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे प्रवेशद्वाराजवळच गाडी उभी करण्यात आली. बाळ आणि आईबद्दल कळताच रुग्णालयातील महिला कर्मचारी धुरपता पंडित, लताबाई मुनेश्वर, रमाबाई पाईकराव ,लताबाई नरवाडे आदींनी गाडीकडे धाव घेतली. त्यांनी बाळ- बाळंतीण यांची पाहणी करून गाडीतच नाळ कापली. त्यानंतर बाळाला व बाळंतणीला दवाखान्यात घेतले. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले .
या फजिती मुळे कुटुंबीय आणि नातेवाईक मात्र चांगलेच हादरले होते. गाडी चालक राजू गाडे यांनी मी गाडी हळू चालवत होतो मात्र रस्त्यामध्ये खड्डेच जास्त असल्याने त्यांना त्रास वाढला व त्या दहा मिनिटांच्या अंतरातच प्रसूत झाल्या. तर मुलीचे पिता बबन चव्हाण यांनी मुलगी आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याने समाधान व्यक्त सुटकेचा निश्वास टाकला.