दसरा महोत्सवाची तयारी जोरात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:34 PM2019-09-26T23:34:17+5:302019-09-26T23:34:31+5:30
येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. या महोत्सवाची मंद गतीने सुरू असलेली तयारी आता गतिमान झाल्याचे दिसत आहे.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर दरवर्षी दसरा महोत्सव मोठ्या थाटात भरतो. यंदा मात्र दसरा महोत्सवाच्या तयारीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे हा परिणाम होत होता. आधीच प्रशासनाला निवडणुकीची कामे मोठ्या प्रमाणात असतात. त्यात हा महोत्सव हाताळायचे म्हणजे अवघडच काम आहे. त्यामुळे खाकीबाबा मठाचे महंत व शहरवासीयांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र पाळण्यांसह इतर बाबींच्या निविदांना विलंब झाला. त्या काढल्या तर वाटाघाटीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे हे पाळणे येणार की नाही, याची शंका होती. मात्र यातील वाटाघाटी यशस्वी झाल्याने आता पाळणेही येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रदर्शनीची उभारणी करण्याच्या कामाला फारसी गती नव्हती. मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी सातत्याने या कामाच्या ठिकाणी भेटी देत आहेत. त्यामुळे या कामालाही आता गती येत असल्याचे दिसत आहे. इतर अधिकारीही या ठिकाणी भेटी देत आहेत. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व इतरांनीही येथे भेटी दिल्या.
आज पाळण्यांचे कामही सुरू करण्यासाठी साहित्य येवून पडले आहे. त्यामुळे हे कामही आजपासून सुरू होणार असल्याचे दिसत आहे. दुपारच्या वेळी या पाळण्यांचीही लगबग दिसून येत होती. त्यामुळे आतापर्यंत दसरा महोत्सव यंदा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आता हे काम सुरू झाल्याने विश्वास बसणार आहे.
२९ रोजी रामजन्मोत्सव
२९ रोजी रोजी दुपारी १२ वाजता हिंगोली येथील बद्रीनारायण मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणेच २९ रोजी दुपारी ४ वाजता रामलीला मैदानावरून श्री हनुमानजींची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
दसरा प्रदर्शनी तसेच प्रदर्शनीतील दुकाने, आकाश पाळण्यांचा लिलाव झाला आहे. मोठा आकाश पाळणाचे कंत्राट १७ लाख ५१ हजार रूपयांना दिले आहे. तर लहान आकाश पाळणा २ लाख २५ हजार रूपये, हॉटेल व पानटपरी १ लाख ३१ हजार, प्रदर्शनी ६ लाख ५० हजारास दिली आहे.