जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:21+5:302021-05-17T04:28:21+5:30
गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. १५ मे रोजी कमाल तापमान ३९, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस ...
गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. १५ मे रोजी कमाल तापमान ३९, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. १६ मे रोजीही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान वारेही मंदावले होते. अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कौठा, नांदापूर, नर्सी नामदेव, करंजी, डोंगरकडा, वारंगाफाटा, जवळा पांचाळ, डिग्रस कोंढूर, कळमनुरी शहरासह परिसर, पोत्रा, केंद्रा (बु.), कनेरगावनाका व परिसर आदी भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी, तर काही ठिकाणी जास्त होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी उन्हाळी भुईमूग काढणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे भुईमुगाचे काढ घरी नेताना शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसामुळे कसरत करावी लागली.
पावसात झाडाखाली थांबू नये...वादळी वारे, पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असल्यास शेतकऱ्यांनी बाहेर पडू नये, तसेच झाडांच्या आडोशालाही उभे राहू नये. कारण झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता असते. दुसरीकडे जनावरांना झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नये. अवकाळी पावसात जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने केले आहे.