पितृपंधरवड्यात कद्दू खातोय भाव; भाजी मंडईत १० तर घराजवळ २० रुपये नग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:17+5:302021-09-24T04:35:17+5:30
हिंगोली : सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे गवार, काकडी, कद्दू, फुलकोबी, पानकोबी या भाज्यांची मागणी वाढली असल्याचे दिसून येत ...
हिंगोली : सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे गवार, काकडी, कद्दू, फुलकोबी, पानकोबी या भाज्यांची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. भाजी मंडईत कद्दू १० रुपये, तर घराजवळ कद्दूला भाव मात्र वाढलेला पहायला मिळत आहे. २० रुपयाला एक नग या प्रमाणे कद्दू खरेदी करावा लागत आहे.
दोन महिन्यांपासून भाज्यांची आवकही चांगली आहे; परंतु काही व्यापारी मात्र चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील डिग्रस, औंढा, दाटेगाव, लोहगाव, भांडेगाव, साटंबा, सवड, पुसेगाव आदी ठिकाणांहून शहरातील मंडईमध्ये भाजीपाला येतो. सध्या पितृपंधरवडा असल्यामुळे जेवणामध्ये भाज्यांचा मान असतो. मंडईत जो भाव आहे तो भाव घराजवळ मिळत नाही. गाडीवाले जो भाव सांगतील त्या भावानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
छोटे विक्रेते काय म्हणतात...
महागाईने कळस गाठल्यामुळे शेतकऱ्यांकडून भाज्या घेणे परवडेना झाले आहे. भाज्यांची आवक सध्या चांगली असली तरी काही भाज्यांसाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
-बाळासाहेब देशमुख, भाजी विक्रेता
पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे काही भाज्या महागल्या आहेत. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ५ रुपये भावानेच ते मंडईत विकले जात आहेत. महागाईमुळे हा व्यवसाय करणेही अवघड होऊन बसले आहे.
-शेख फेरोज, भाजी विक्रेता
मागणी वाढली...
पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे गवार, भेंडी, टोमॅटो, फुलकोबी, पानकोबी, हिरवी मिरची, शेवगा, दोडका आदी भाज्यांना मागणी वाढली आहे. कोथिंबीर तर १०० ते १२५ रुपये किलोने मंडईत विकली जात आहे. शेवगा तर ७० रुपये किलोने विक्री होत आहे.
अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार?
अर्धा किलोसाठी मंडईत जाणे शक्य नसल्यामुळे घराजवळ आलेल्या गाड्यावरून भाजी घ्यावी म्हटले तर विक्रेते जास्तीचा भाव सांगतात. अशावेळी मंडईत जाऊन भाजी आणलेली बरे असे कधी-कधी वाटते.
- सुरेखा कल्याणकर, गृहिणी.
- भाजी मंडई दूर असल्यामुळे घराजवळ आलेल्या भाजी विक्रेत्याकडून भाजी घेणे सध्या परवडेना झाले आहे. नाईलाजाने भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागत आहे.
- मनीषा शिंदे, गृहिणी.