दूध, साखरेचे भाव जैसे थे; मग मिठाईचे महाग का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:05+5:302021-09-16T04:37:05+5:30
हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे ...
हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे नियंत्रण असते हे कळायला मात्र मार्ग नाही.
सद्यस्थितीत दूध ६० रुपये लिटर, तेल १४० ते १६० रुपये किलो, साखर ४० रुपये किलो आहे. या मानाने मिठाईचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गोडधोड खावे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव आजही पाहायला मिळत आहेत. मिठाईचे दर तयार झालेल्या मिठाईनंतर ठरविले जातात, असे स्वीटमार्ट चालकांनी सांगितले.
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
मलई पेढा २८० आधीचा दर
२८० गणेशोत्सवात
अंजीर बर्फी ४०० आधीचा दर
४०० गणेशोत्सवात
कलाकंद बर्फी ३२० आधीचा दर
३२० गणेशोत्सवात
बदाम बर्फी ४०० आधीचा दर
४०० गणेशोत्सवात
दरांवर कोणाचे नियंत्रण?
साखर, दूध व इतर पदार्थाचे भाव जैसे थे असताना मिठाईचे दर मात्र वाढलेले पाहायला मिळत आहेत. मिठाईचा दर स्वीटमार्ट चालकच ठरवितात. यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे एका मिठाई चालकाने सांगितले.
ग्राहक काय म्हणतात...
सणासुदीच्या काळात घरोघरी गोडधोड केले जाते, परंतु यावर्षी मिठाईचे दर जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोड पदार्थ खावे की नाही, हा प्रश्नच आहे.
-ज्ञानेश्वर सुरुशे, नागरिक
स्वीटमार्ट चालकांनी मिठाईचे दर वाढविल्यामुळे सणासुदीला कमी प्रमाणात मिठाई घरी आणावी लागते. साखरेचे प्रमाणही बहुतांश मिठाईमध्येच जास्त आहे.
विकास गिरी, नागरिक
का वाढले दर?
गत काही महिन्यांपासून दूध, साखर, गॅस, तेल आदीचे भाव वाढले आहेत. हे सर्व करत असताना कामगारांनाही पगार द्यावा लागतो. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेले आहेत.
-मख्खन शर्मा, स्वीटमार्ट चालक
कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव गणेशोत्सव काळात कायम आहेत. महागाईने मागील काही दिवसांपासून कळस गाठला आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेल्याचे एका स्वीटमार्ट चालकाने सांगितले.
भेसळ केल्यास कारवाई अटळ
सणासुदीच्या काळात कोणत्याही पदार्थात भेसळ केल्यास किंवा काही शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- पी.एस. कच्छवे, निरीक्षक