माजी जि.प.सदस्याच्या आखाड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:47 AM2019-09-11T00:47:02+5:302019-09-11T00:47:42+5:30
औंढा तालुक्यातील पुरजळ शेतशिवारात माजी जि.प.सदस्य बालाजी क्षीरसागर यांच्या आखाड्यावर छापा मारून पोलिसांनी ९ जणांना झन्ना-मन्ना जुगार खेळताना पकडले आहे. यात ७ लाख ७६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा तालुक्यातील पुरजळ शेतशिवारात माजी जि.प.सदस्य बालाजी क्षीरसागर यांच्या आखाड्यावर छापा मारून पोलिसांनी ९ जणांना झन्ना-मन्ना जुगार खेळताना पकडले आहे. यात ७ लाख ७६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
पुरजळ येथील आखाड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. यात आखाडा मालक बालाजी गणपत क्षीरसागरसह रुस्तुम दाजिबा कदम (रा.धानोरा), शिक्षक गंगाधर मानवते (रा.जवळा), गजानन नागरे (रा.असोला), पं.स. सदस्य भगवान कदम (रा.तपोवन), श्रीपाद जोशी (रा.जवळा), तलाठी परमेश्वर गरुड (रा. सावंगी), निवृत्ती कदम (रा.तपोवन), गजानन ढोबळे (रा.असोला) अशी आरोपींची नावे आहेत. या ठिकाणी जुगाराच्या साहित्यासह रोख ५२ हजार २५0 रुपये, ५९ हजारांचे सात मोबाईल, १ लाख ६५ हजारांच्या ४ दुचाकी, पाच लाखांची एक चारचाकी जप्त केली. चारचाकी मंडळ अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई फौजदार शिवसांब घेवारे, के.डी.पोटे, कर्मचारी बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, आशिष उंबरकर, भगवान आडे, किशोर काटकरे, राजेसिंग ठाकूर, आकाश टापरे, विठ्ठल काळे आदींनी केली. यंदा गणेशोत्सवापासून जुगार अड्ड्यांवरील कारवाया वाढल्या आहेत. आता तर चक्क माजी जि.प.सदस्याच्या आखाड्यावरच हा प्रकार आढळून आला आहे. पुढारी, अधिकारी व कर्मचारीही जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे.